भगूर परिसरात रेल्वे मार्ग ओलांडताना साकेत एक्स्प्रेसची धडक बसून एका युवतीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर धोकादायक पध्दतीने रेल्वे मार्ग ओलांडण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकरोड स्थानकावर दररोज शेकडो प्रवासी या पध्दतीने खुलेआम रेल्वे मार्ग ओलांडतात. स्थानकातील दादराच्या (स्थानकातील पादचारी पूल) सुरक्षितपणे फलाटावर पोहोचणे अथवा स्थानकाबाहेर पडता येते. तथापि, प्रवासी त्याकडे डोळेझाक करून रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोका पत्करतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलीस,  प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात नसल्याने प्रवाशांची बेफिकीर वृत्ती आणि प्रशासनाची उदासिनता यामुळे अपघातांची मालिका कायम राहण्याची शक्यता आहे. महिन्याकाठी ३०० प्रवाशांवर कारवाई केली जात असूनही त्यांच्या मानसिकेत बदल होत नसल्याचे दिसून येते.
नाशिकरोड रेल्वे स्थानक वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. नाशिकहून मुंबईला ये-जा करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
या शिवाय, देशातील इतर भागात ये-जा करणारे भाविक आणि नागरिकांची संख्या कमी नाही. रेल्वे स्थानकावरील चार फलाटांवर ये-जा करणाऱ्यासाठी दादराची व्यवस्था आहे. आपल्याकडील वजनदार साहित्य सुकरपणे प्रवाशांना नेता यावे याची दक्षता पादचारी पुलांची उभारणी करताना घेण्यात आली आहे. रेल्वेमार्ग कोणी थेट न ओलांडता दादरा अर्थात पादचारी पुलाचा वापर करावा असा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी काही प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन करण्यात धन्यता मानली आहे. सकाळच्या सुमारास पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसद्वारे मुंबईला जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दी असते. यावेळी फलाटावरून रेल्वेत शिरल्यास जागा मिळेल की नाही या धास्तीने शेकडो प्रवासी रेल्वे मार्गावर उभे राहून गाडी पकडतात. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी दादराऐवजी रेल्वे मार्ग सर्रासपणे ओलांडला जातो. या धोकादायक मार्गाचा अवलंब केल्याने अनेकदा प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. काहींना यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले. असे सारे घडत असताना प्रवाशांनी नियमांना धाब्यावर बसण्याची मानसिकता ठेवली आहे.
रेल्वे प्रशासन वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचा भडिमार करत असले तरी प्रवाशांचे त्याकडे लक्ष नसते. स्थानकात प्रवेश करण्यापासून रेल्वेत बसण्यापर्यंत प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येते. फलाटाचे तिकीट न घेता स्थानकात प्रवेश करणे, विनातिकीट प्रवास करणे, धोकादायक पध्दतीने रेल्वे रुळ ओलांडणे हे प्रकार अव्याहतपणे घडत आहेत. सकाळपासून शेकडोंच्या संख्येने प्रवासी थेट रेल्वे मार्ग ओलांडत असताना रेल्वे पोलीस व प्रशासन कानाडोळा करण्याची भूमिका घेताना दिसते. कारण, दररोज असंख्य प्रवासी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवर उभे राहतात. कित्येक जण दादराऐवजी रेल्वे मार्ग ओलांडून फलाटावर ये-जा करतात. दिवसभर हे प्रकार घडत असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाई होताना दिसत नाही. याबाबत रेल्वे पोलीस सुरक्षा दलाचे निरीक्षक इप्पर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्याविरूध्द रेल्वे नियामक मंडळाच्या कलम १४७ नुसार रेल्वे न्यायालयात गुन्हे दाखल केले जातात. अवघ्या सहा महिन्यात २१००-२२०० प्रवाशांवर अशा स्वरूपातील कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयामार्फत कारवाई होत असली तरी प्रवाशांची मानसिकता मात्र बदलत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा