‘माझ्या आयुष्याचा आधार होती ती. माझा मुलगाच होती ती.. पण ती गेलीच.. आता आमचंही जगणं संपलय!’ अशा शब्दांत आपल्या वेदनांना धनंजय पाटील यांनी वाट करून दिली. उपनगरी रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांच्या मुलीला, पूजा पाटील या महाविद्यालयीन तरुणीला जीव गमवावा लागला. एखाद्या रेल्वे दुर्घटनेत ज्या घरातील कुणी दगावलंय, त्या घरात अशा अपघाताची प्रत्येक बातमी जुन्या वेदनेवरची खपली काढते, आणि त्या जखमा पुन्हा भळभळू लागतात..
अपघातात सापडून जखमी अवस्थेत विव्हळणारा एखादा प्रवासी, केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतो.. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या हद्दीत दिवसागणिक १० ते १२ जणांचा मृत्यू ओढवतो. कागदपत्रे आणि प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेलाच अनेकदा अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला जातो. कालच्या अपघातानंतरही, जखमींना इस्पितळात दाखल करण्याऐवजी कागदपत्रांची पूर्तता करण्यातच तब्बल तासाहून जास्त वेळ गेल्याच्या तक्रारी प्रवासी करीत आहेत.
दादर रेल्वे स्थानकात गेल्या २३ जूनला पूजा पाटील लोकलमध्ये चढत असताना रेल्वे आणि फलाटाच्या मधील पोकळीत फसली, आणि गाडीखाली गेली. तिला पालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी कुटुंबीयांनी पैशांची जमवाजमव केली, आणि तिला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्याची तयारीही सुरू केली. पण जखमी पूजाने ३ ऑगस्टला, अखेरचा श्वास घेतला. तिच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर झालेल्या आघातातून तिचे कुटुंब अद्यापही सावरलेले नाही. वयाची सत्तरी पार केलेले तिचे वडील, धनंजय पाटील आपल्या मुलीच्या आठवणीने क्षणाक्षणाला कासावीस होतात.
.. याच वेदना इतरही अनेक घरांमध्ये आहेत. गेल्या महिन्यात ग्रँट रोड स्थानकात रेल्वेमध्ये चढताना निसरडय़ा फलाटावरून पाय घसरल्याने १९ वर्षांंचा एक युवक गाडीखाली गेला आणि जायबंदी झाला. त्याचा तुटलेला पाय पुन्हा जोडता यावा यासाठीचे प्रयत्न फोल ठरले. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी रे रोड स्थानकात गाडीत चढताना एका बेसावध क्षणी रेल्वेगाडी आणि फलाट यांच्यामध्ये सापडून पडल्याने महमंद नावाच्या १९ वर्षांंच्या मुलाला हात गमवावा लागला. अपघातानंतर उपचारासाठी आठ तास उलटून गेल्याने, त्याचा तुटलेला हात पुन्हा जोडता आला नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते..
मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पण एखाद्या दुर्घटनेनंतर तात्काळ औषधोपचार न मिळाल्याने अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागत असल्याचे न्यायालयानेही वारंवार रेल्वेच्या निदर्शनास आणूनही दिले आहे.
अशी तत्परता दाखवा!..
नालासोपारा येथे अपघातात प्रियल शहा या तेवीस वर्षीय महिलेचा हात तुटला. तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तो हात सोबत घेऊन रुग्णालयात धाव घेतली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या महिलेचा शरीरापासून वेगळा झालेला हात जोडण्यात डॉक्टरांना यश आले. नातेवाईक सोबत असल्यामुळे या महिलेला तातडीने उपचार मिळाले.. अशी तत्परता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली तर अनेकांचे जीव वाचू शकतात. पण कागदी घोडय़ांच्या शर्यती लावणाऱ्यांनी मानवी जिवासाठीही थोडा वेग वाढवावा, अशी अपेक्षा सामान्य प्रवासी वेळोवेळी व्यक्त करतात. पण त्याचा उपयोग होत नाहीच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा