लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट काढल्यानंतर पहिल्याच फटक्यात आरक्षित तिकीट मिळणे, हे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याइतके दुरापास्त झाले आहे. प्रत्येक गाडीसाठी असलेली वाढती प्रतीक्षा यादी आणि प्रत्यक्ष गाडी सुटण्याआधी प्रतीक्षा यादीतील नाव आरक्षित यादीत आले आहे की नाही, हे पाहण्यासाठी लागणाऱ्या ‘ऑनलाइन रांगा’, हा सर्वच प्रकार प्रवाशांसाठी प्रचंड तापदायक ठरत आहे. मात्र आता या कटकटीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘एसएमएस अ‍ॅलर्ट’ सेवा सुरू केली आहे. या सेवेमार्फत प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षण यादी तयार झाल्याझाल्या त्यांच्या आरक्षणाची प्रत्यक्ष स्थिती मोबाइलवर कळणार आहे. त्यासाठी तिकिटांचे आरक्षण करताना आरक्षण अर्जावर प्रवाशांना आपला मोबाइल क्रमांक लिहावा लागणार आहे. त्यामुळे आता तिकीट दलालांनाही आपोआपच चाप बसणार आहे.
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची प्रतीक्षा यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे बाराही महिने प्रचंड वाढलेलीच असते. मात्र या प्रतीक्षा यादीतील आपले नाव प्रत्यक्ष आरक्षित तिकिटांच्या यादीत आहे अथवा नाही, हे कळण्यासाठी प्रवाशांना प्रचंड कष्ट करावे लागतात. गाडी सुटण्याच्या तीन ते चार तास आधी ‘आरक्षण यादी’ तयार होते. ही यादी पाहण्यासाठी किंवा आपल्या तिकिटाच्या स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी प्रवासी १३९ या कॉल सेंटर क्रमांकावर फोन करतात किंवा संकेतस्थळावर तपासतात.
मात्र अनेकदा या संकेतस्थळावरही अनेक लोक एकाच वेळी आपल्या तिकिटाची स्थिती तपासत असल्याने संकेतस्थळ ‘हँग’ होते. हा त्रास टाळण्यासाठी रेल्वेने प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची स्थिती थेट एसएमएसद्वारे कळवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रवाशांना आरक्षण करताना अर्जावर आपला मोबाइल क्रमांक लिहावा लागणार आहे.  सध्याच्या आरक्षण अर्जावर दूरध्वनी क्रमांक लिहिण्यासाठी रकाना आहे. तेथेच प्रवाशांनी आपला मोबाइल क्रमांक लिहायचा आहे. मात्र खास मोबाइल क्रमांकासाठी रकाना असलेले आरक्षण अर्ज लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
कधी मिळणार एसएमएस अ‍ॅलर्ट
आरक्षित तिकीट काढल्यानंतर प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या तिकिटधारकांना प्रत्यक्ष प्रवासाच्या पाच दिवस आधीपासून त्यांच्या तिकिटाच्या स्थितीबद्दलची अद्ययावत माहिती दर दिवशी एक एसएमएस पाठवून देण्यात येईल. प्रतीक्षा यादीतील क्रमांक पुढे सरकला आहे का, आरक्षण यादीत नाव आल्यास बोगी क्रमांक, आसन क्रमांक या सर्वाची माहिती प्रवाशांना पाच दिवस आधीपासूनच त्यांच्या मोबाइलवर मिळेल. तसेच प्रवासाच्या तीन-चार तास आधी अंतिम आरक्षण यादी तयार होते. ही यादी तयार झाल्याझाल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाबद्दल माहिती कळेल.
तिकीट दलालांना आळा
तिकीट आरक्षण करताना अर्जावर प्रवाशाचा मोबाइल क्रमांक टाकायचा असल्याने तिकीट दलालांना या सुविधेमुळे आळा बसणार आहे. तिकिटाच्या स्थितीबद्दल योग्य माहिती मिळवायची असल्यास, आरक्षण अर्जावर अधिकृत प्रवाशाचा मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. दलालांनी तिकिटे काढल्यास त्यांना हा क्रमांक देणे शक्य होणार नाही. तसेच दलालांकडून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ मिळणार नाही. परिणामी अप्रत्यक्षपणे या सुविधेमुळे दलालांना आळा बसण्याची आशा आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway ticket reservation information through sms now