नागपूर- वर्धा रेल्वे मार्गावरील सिंदी- तुळजापूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांखालचा भराव वाहून गेल्याने ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारी मुंबई-नागपूर हा डाऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
गेल्या शुक्रवारी रात्री अतिशय जोरदार पावसामुळे सिंदी- तुळजापूर दरम्यान किलोमीटर ७८९ नजीकच्या सुमारे साडेतीनशे मीटर लांबीच्या रुळांखालील माती व गिट्टी वाहून गेल्याने या मार्गावरून रेल्वे वाहतूक बंद झाली होती. मुंबई-हावडा व दिल्ली- चेन्नई हे मार्ग प्रभावित झाल्यामुळे अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर सुमारे ७५ गाडय़ा बदललेल्या मार्गाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना प्रवासाचा बेत रद्द करावा लागला.
या घटनेनंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हा मार्ग पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्नांना दिशा दिली. अतिरिक्त व्यवस्थापक जयदीप गुप्ता यांच्याकडे नियंत्रण कक्षातून सूत्रे हलवण्याची जबाबदारी होती. रुळांखाली भराव घालून ते जमिनीच्या पातळीवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. दगड, रेती व गिट्टी ही सामुग्री सुमारे ३०० विशेष व्ॉगन्सद्वारे घटनास्थळी आणण्यात येऊन जवळजवळ ६०० मजुरांनी भराव घालण्याचे अथक प्रयत्न सुरू केले.
सोमवारी दुपारी मुंबई- नागपूर या डाऊन मार्गावरून वाहतूक सुरू झाली. हैदराबाद- निझामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस त्यानंतर चेन्नई- जयपूर एक्सप्रेस, चेन्नई- नवी दिल्ली जीटी एक्सप्रेस, बंगलोर- पाटणा संघमित्रा एक्सप्रेस, एलटीटी- भुवनेश्वर एक्सप्रेस, अहमदाबाद- नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, कुर्ला- शालिमार एक्सप्रेस, जयपूर- चेन्नई एक्सप्रेस, नवी दिल्ली- चेन्नई जीटी एक्सप्रेस, नवी दिल्ली- हैदराबाद आंधप्रदेश एक्सप्रेस आणि नवी दिल्ली- चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस या गाडय़ा दोन दिवसांनंतर मूळ मार्गाने धावल्या. नागपूर- मुंबई हा ‘अप’ मार्ग उद्या दुपापर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.

Story img Loader