‘नेमेचि येतो पावसाळा’ या ऊक्तीप्रमाणे मध्य रेल्वेतील महाप्रंबधकांच्या स्थानक निरीक्षण कार्यक्रमाची घटिका जवळ येताच ठाण्यापासून कर्जत-कसाऱ्यापर्यंतच्या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये रंगरंगोटीचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला असून अरुंद आणि कमी संख्येने असलेले पादचारी पूल, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकल, अस्वच्छतेचे आगार ठरू लागलेली स्वच्छतागृहे, तिकीट खिडक्यांचा अभाव अशा मोठय़ा आणि दररोजच्या हाल-अपेष्टांचे कारण ठरणाऱ्या या मोठय़ा प्रश् नांच्या तुलनेत महाप्रबंधकांच्या नजरेत भरावी यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेली रंगरंगोटीची ही मलमपट्टी प्रवाशांचे सध्या मनोरंजन करू लागली आहे. महाप्रबंधकांच्या दौऱ्यापूर्वी दरवर्षी अशा प्रकारे रंगरंगोटीचे सोपस्कार पूर्ण केले जातात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. रंगरंगोटी होणार असेल तर चांगलेच आहे, परंतु स्थानकांमधील मोठय़ा प्रश्नांचा निपटारा कधी होणार, असा सवाल प्रवासी संघटना उपस्थित करू लागल्या आहेत.
 उपनगरीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवरील अस्वच्छता आणि गैरसोईमुळे रेल्वेचा दररोजचा प्रवास हा रेल्वे प्रवाशांसाठी असंख्य अडचणींनी भरलेला असतो. प्रवाशांना सेवासुविधा देण्यामध्ये अपयशी ठरत असलेले रेल्वे प्रशासन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानकांच्या रंगरोटीसारख्या तात्पुरत्या मलमपट्टीला सुरुवात करते. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या निरीक्षण कार्यक्रमाचे निमित्त साधून या रंगरंगोटीस सुरुवात केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी.बी खरे यांच्या निरीक्षण कार्यक्रमाचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळेच रेल्वे स्थानकांच्या मलमपट्टीमध्ये प्रत्येक स्थानक अधिकाऱ्यांनी स्वत:ला जुंपून घेतले आहे. मात्र या तात्पुरत्या मलमपट्टीविषयी प्रवासी संघटनांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांचा वार्षिक निरीक्षण कार्यक्रम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकासाठी एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. स्थानकाची रंगरंगोटी तसेच सगळ्या व्यवस्थांचा आढावा अधिकारी घेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाप्रबंधकांच्या निरीक्षण कार्यक्रमात प्रत्येक स्थानकात भव्य स्वागत समारंभ आयोजित होत असतात. यंदाही या समारंभाची तयारी सुरू आहे. मुंबईपासून ठाणे, डोंबिवली, कल्याण, कसारा, इगतपुरीपर्यंत तर कर्जतकडील स्थानकांमध्ये निरीक्षण कार्यक्रम प्रतिवर्षी होतो. प्रवासी संघटनांना समस्या मांडण्यासाठी महाप्रबंधकांशी संवाद साधण्याची ही संधी असली तरी संघटनांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असते. त्यामुळे प्रवाशांच्या नेमक्या अडचणीच लक्षात न घेता निरीक्षण करण्यात काय हाशील आहे, असा सवाल प्रवासी संघटना करत आहेत.
निरीक्षण कार्यक्रम निव्वळ फार्स..
दरवर्षी महाप्रबंधकांचा वार्षिक निरीक्षण कार्यक्रम होत असून त्यासाठी केवळ रंगरंगोटीसारखी आणि त्या दिवसापुरती स्वच्छता हेच प्रशासन करत असते. मात्र स्वच्छतागृहांची अस्वच्छता, फलांटाची दुरवस्था, पाणपोईंची दुरवस्था आणि स्थानकाच्या अन्य पायाभूत सुविधांकडे मात्र नेहमीचे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास या समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यास रेल्वे प्रशासन निरुत्साही आहे. रेल्वेची हीच कार्यपद्धती रेल्वे प्रवाशांना खटकणारी असून अनेक वेळा महाप्रबंधकांनी दौऱ्या प्रसंगी दिलेल्या सूचनादेखील पुढे रेल्वे प्रशासन पाळत नाहीत. त्यामुळे महाप्रबंधकांचा निरीक्षण कार्यक्रम म्हणजे केवळ फार्स म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
छोटय़ा स्थानकांकडे कायम दुर्लक्ष..
रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी येत असल्यास भेट देण्यात येणारी स्थानके सजवली जातात. मात्र छोटय़ा स्थानकांकडे दुर्लक्षच असते. दिवा स्थानक हे ठाण्याच्या जवळचे जंक्शन स्टेशन असले तरी या स्थानकांवर महाव्यवस्थापकांचा थांबा नसतो. कोकण रेल्वेच्या अनेक गाडय़ा पकडण्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांसाठी हक्काचे स्थान बनले असले तरी रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने मात्र ते दुर्लक्षित असेच आहे. सहा फलाट असलेले हे स्थानक गैरसोईचे बनले आहे त्यामुळे हे स्थानकदेखील महाप्रबंधकांनी सुधारण्याची गरज आहे, असे मत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे.     

Story img Loader