यंदा खरीप हंगामात राज्यात झालेल्या सततच्या पावसाचा सोयाबीनला मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात सोयाबीनच्या उत्पादनात २.१०६ लाख मेट्रिक टनाची घट होण्याचा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) वर्तवला आहे.
यंदा राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली आणि सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नंतर परतीच्या पावसाने कहर केला आणि काढणीवर असलेल्या सोयाबीनला हादरा दिला. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनने आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात सोयाबीन लागवडीखालील ३८.७०४ हेक्टर क्षेत्रात ४८.५६५ लाख मे.टन उत्पादन अपेक्षित धरण्यात आले होते. परतीच्या पावसाने केलेले नुकसान लक्षात घेऊन ‘सोपा’ने गेल्या १ ते ७ ऑक्टोबपर्यंत केलेल्या सर्वेक्षणानंतर आता दुसरा अंदाज ४६.४५९ लाख मेट्रिक टन वर्तवण्यात आला आहे. ‘सोपा’ने देशातील विविध भागात सर्वेक्षण केले आणि सोयाबीनच्या परिस्थितीविषयी माहिती संकलित करण्यात आली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या सोयाबीनच्या सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये पावसाचा सोयाबीनला फटका बसला आहे. मात्र, महाराष्ट्रातील नुकसान लक्षणीय आहे. राज्यात सोयाबीनची उत्पादकताही १२५५ किलोग्रॅम प्रती हेक्टरवरून १२०० किलोग्रॅमपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र विदर्भात विशेषत: पश्चिम विदर्भात आहे. गेल्या दीड दशकांमध्ये या कापूस उत्पादक पट्टय़ात रोखीचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. अमरावती विभागात सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने सोयाबीनवर प्रक्रिया करणारे कारखाने या भागात उभे राहिले, पण पावसाची अनियमितता, भावातील अस्थिरता, मशागतीपासून ते खतांपर्यंत वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत सोयाबीनऐवजी पुन्हा परंपरागत कपाशीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. अजूनही कपाशीसोबतच सोयाबीनचेच वर्चस्व या भागात आहे. यंदा खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने सोयाबीनची उत्पादकता वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, संततधार पावसामुळे अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचून सोयाबीन कुजले. काही भागात तर अतिवृष्टीत पिके वाहून गेली. काही भागात तगलेल्या सोयाबीनचे परतीच्या पावसाने नुकसान केले. राज्यात सर्वदूर अशीच स्थिती होती.
मध्य प्रदेशातही संततधार पावसामुळे नुकसान झाले. पहिल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील सोयाबीनच्या लागवडीखालील ६२.६०६ लाख हेक्टर क्षेत्रात ५९.४७ लाख मे.टन उत्पादन अपेक्षित होते. दुसऱ्या अंदाजानुसार आता उत्पादन ५६.१४ लाख मे.टनापर्यंत कमी होणार आहे. राजस्थानमध्येही सोयाबीनचे उत्पादन १२.१७ लाख मे.टनांहून १०.१२ लाख मे.टन इतके कमी होईल, असा अंदाज आहे. या कमी उत्पादनाचा परिणाम सोयाबीन पदार्थाच्या निर्यातीवरही जाणवणार आहे. आधीच मंदीच्या सावटाखाली जगणाऱ्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
देशभरात गेल्या वर्षी १२१.८४ लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा ‘सोपा’च्या पहिल्या अंदाजानुसार देशात १२९.८३ लाख मे.टन सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित होते. ते आता १२२.३४ लाख मे.टन पर्यंत खाली येण्याचा कयास आहे, अशी माहिती ‘सोपा’चे प्रवक्ते आणि समन्वयक राजेश अग्रवाल यांनी दिली आहे.