चंद्रपूर जिल्ह्य़ात सर्वदूर पाऊस सुूरू असून गेल्या चोवीस तासांत सरासरी ७७.५८ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. धानपट्टय़ातही चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक १३० मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली. मान्सूनच्या आगमनानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ३३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३० मि.मी. पाऊस धारणी तालुक्यात झाला, तर येत्या २४ तासांत गोंदिया जिल्ह्य़ात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांत एकूण १४३ मि.मी. पाऊस झाला. गोंदिया शहरासह जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत शुक्रवारीही सुमारे तासभर जोरदार मृगधारा बरसल्या. तसेच वाशीम, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्य़ातही सर्वदूर १८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, कळमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ात संततधार
चंद्रपूर- जिल्ह्य़ात सर्वदूर संततधार पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या चोवीस तासांत सरासरी ७७.५८ मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली. धानपट्टय़ातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक १३० मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली, तर पहिल्याच पावसात शहरातील भूमिगत गटार योजनेची पोलखोल झाली आहे.
तीव्र उन्हाच्या झळा सोसणाऱ्या या जिल्ह्य़ातील लोकांना पावसाची प्रतीक्षा होती. मान्सूनला सुरुवात झाल्यानंतरही पावसाचा थांगपत्ता नव्हता, मात्र काल गुरुवारी दुपारी पावसाची झड सुरू झाली. गेल्या चोवीस तासांत ७७.५८ मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. काल रात्री व आज दिवसभर रिमझिम पाऊस झाला. या जिल्ह्य़ातील पंधराही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. चंद्रपूर शहरात जेथे ७२.१ मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली, तेथे सावली तालुक्यात १३० मि. मी. पाऊस झाला. सततच्या पावसाने शहरातील भूमिगत गटार योजनेची पोलखोल झाली आहे.
आज सकाळी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर सर्वदूर पाणीच पाणी साचले होते. महानगरपालिकेने नुकतेच शहरातील मुख्य रस्त्यांचे व भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण केले. महापौर संगीता अमृतकर व आयुक्त प्रकाश बोखड यांनी रस्त्यावर पावसाचे पाणी दिसणार नाही, असा दावा केला होता. परंतु आझाद बगिचासमोरील पुलाची उंची कमी केल्याने नाल्यातून पाणी जाण्यास जागा नाही. यासोबतच मुख्य रस्त्यावर पाण्याचे झरे फुटले आहेत. त्याचा परिणाम बगिचासमोरील रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले होते. नाले व गटारांची सफाई योग्य पद्धतीने न केल्यामुळे गटारातील घाण रस्त्यावर साचली आहे. कस्तुरबा चौक, गांधी चौक, सिटी हायस्कूल या भागातही पाणी साचले होते.
शहरात गल्लीबोळात ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने खड्डय़ांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मनपाने भूमिगत गटारचे चेंबर तयार केले. मात्र पहिल्याच पावसात सर्व गटारे वाहून गेली आहेत.
मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण शहर पाण्याखाली येईल, अशी परिस्थिती येथे आहे. ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे. नांगरणी, वखरणी व धूळपेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. जिल्ह्य़ात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे.
चंद्रपूर ७२.१ मि.मी., बल्लारपूर ६४, गोंडपिंपरी ९५.४, पोंभूर्णा ७१, मूल १०१.४, सावली १३०, वरोरा ७०.२, भद्रावती ४८, चिमूर ३९, ब्रह्मपुरी ८२.४, सिंदेवाही ६८.२, नागभीड २६.४, राजुरा ७९.२, कोरपना ११५.२, जिवती १०१ मि. मी. पाऊस झाला आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर यावर्षी पेरणीच्या कामाला लवकर सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कुरील यांनी दिली.
अमरावती जिल्ह्य़ात दमदार पाऊस
अमरावती- मान्सूनच्या आगमनानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ३३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३० मि.मी. पाऊस धारणी तालुक्यात झाला. या पावसामुळे मालमत्तेच्या हानीचे वृत्त नाही. पेरण्यांची कामे सुरू करण्यासाठी हा पाऊस अनुकूल मानला जात आहे. अमरावती शहरातही गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू होता. शुक्रवारीही पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेल्या १ जूनपासून जिल्ह्य़ात पावसाने नऊ दिवस हजेरी दिली, पण हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात होता. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्य़ातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली. अमरावती शहरात वादळी पावसाने काही भागांत वृक्षाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने त्या भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शहरात चोवीस तासांत ३२.८ मि.मी. पाऊस बरसला. धारणीचा वीजपुरवठाही गुरुवारी रात्रीपासून खंडित आहे. त्यामुळे धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठादेखील होऊ शकला नाही. जिल्ह्य़ात सर्वदूर आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या चोवीस तासांत नांदगाव खंडेश्वर वगळता सर्व तालुक्यांमध्ये पाऊस झाला. पावसाचा जोर संपल्यावर पेरण्यांच्या कामांना सुरुवात होऊ शकेल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. जिल्ह्य़ात १ जूनपासून सरासरी १०७ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस- धारणी- १३० मि.मी., चिखलदरा ३८, अमरावती ३२.८, भातकुली २४, चांदूर रेल्वे ४२, तिवसा ११.८, मोर्शी २४.४, वरूड ३८.२, दर्यापूर २१.५, अंजनगाव सुर्जी १७.६, अचलपूर २१.६, चांदूर बाजार २९.३ आणि धामणगाव रेल्वे ३८.८ मि.मी.
 गोंदियातही हजेरी
गोंदिया- येत्या २४ तासांत जिल्ह्य़ात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांत एकूण १४३ मि.मी. पाऊस झाला. गोंदिया शहरासह जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत शुक्रवारीही सकाळच्या सुमारास सुमारे तासभर जोरदार मृगधारा बरसल्या. त्यानंतर दिवसभर उन्ह-सावलीचा लपंडाव सुरू असतानाच सायंकाळी पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्य़ातील देवरी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, सालेकसा व गोरेगाव तालुक्यातही पावसाने आज दमदार हजेरी लावली.
गोंदिया जिल्ह्य़ात १ ते १३ जूनपर्यंत एकूण ३५३.१ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्य़ातील नदी-नाल्यांच्या काठावरील गावांच्या नागरिकांनी, मासेमारी करणाऱ्यांनी व मुला-मुलींनी नदी-नाल्यांना पाण्याचा पूर असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच सखोल भागात राहणाऱ्यांनीही नदी-नाल्याच्या ठिकाणी आपली गुरेढोरे पाण्याच्या प्रवाहात नेऊ नये. पूरप्रवण भागात बचाव पथके व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात पाऊस
यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वदूर चांगला पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पेरण्यांना सुरुवातही झाली आहे. जिल्ह्य़ात कापूस आणि सोयाबीनची बी-बियाणे, तसेच रासायनिक खतांचा साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे कृषी अधीक्षक अधिकारी एन. बी. तरकसे यांनी सांगितले.
वाशीममध्ये बळीराजात उत्साह
वाशीम- जिल्ह्य़ात सर्वत्र गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. जिल्ह्य़ात खरिपाच्या पेरणीला प्रारंभ केला असून या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या पावसाने नद्या, नाले वाहत असून जलस्रोतामध्येही जलसाठा वाढला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २६९.८० मि.मी. पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊस वाशीम तालुक्यात ६७ मि.मी., रिसोडमध्ये ४८ मि.मी., मंगरुळपीर-४७ मि.मी., कारंजा (लाड)-३९.८० मि.मी., मानोरा ३७.४० मि.मी., मालेगाव तालुक्यात ३०.६० मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्य़ात यावर्षीसुद्धा शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा पेरा वाढविला असून कापूस, मूग, उडीद, ज्वारी या पिकांकडे पाठ फिरविल्याचे वृत्त आहे.
पेरण्या सुरू
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्य़ात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला असून, उघाड मिळताच पेरणीची कामे जोमाने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात ११५.२ मि.मी.च्या सरासरीने १३८२.८ मि.मी. पाऊस झालेला आहे. अहेरी तालुक्यात सर्वाधिक २४६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मृग नक्षत्राला प्रारंभ होताच जिल्ह्य़ात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला प्रारंभ झाला असून तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. काल रात्री सतत दोन तासापर्यंत जोरदार वृष्टी झाली. या पावसामुळे बांधांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले असून जिल्ह्य़ाच्या अंतर्गत भागात वाहणाऱ्या नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, मात्र कुठेही जीवित व वित्तहानीचे वृत्त नाही.

रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी गांडूळ खत, जिवाणू संवर्धकांच्या वापराला प्रोत्साहन दिल्याचे कृषी विभागामार्फत सातत्याने सांगितले जात असले, तरी गेल्या दशकभरात अमरावती विभागात रासायनिक खतांचा वापर २ लाख मेट्रिक टनाने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Story img Loader