कल्याणमधील दुर्गाडी खाडीकिनाऱ्यावरील गोविंदवाडी भागात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. तसेच समुद्राला भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. २६ जुलैचा धोका टाळण्यासाठी गोविंदवाडी भागातील ४५० नागरिकांना पालिकेच्या संक्रमण शिबीर, पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
मुसळधार पाऊस सुरू असतानाच दोन दिवसांपासून समुद्राला भरती असल्याने खाडीचे पाणी दररोज नागरी वस्तीत घुसत आहे. बुधवारी दुपारनंतर खाडीचे पाणी खाडीकिनाऱ्याच्या गोविंदवाडी भागात घुसू लागले. काही नागरिक घरे सोडून निघून गेले. काही घरांमध्ये अडकून पडले. त्यांना तहसीलदार शेखर घाडगे यांचे पथक व पालिकेच्या आपत्कालीन पथकाने बाहेर काढले. या सर्व रहिवाशांना संक्रमण शिबीर, पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. २६ जुलैच्या महापुराच्या वेळी याच भागात ४५० म्हशी पुरात मरण पावल्या होत्या.

Story img Loader