सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसात शहरालगतच्या सोबलेवाडीस जोडणारे दोन रस्ते पाण्यामुळे वाहून गेल्याने तेथील दळणवळण ठप्प झाले आहे. दरम्यान, याच भागात झालेल्या पावसामुळे कुंभारवाडीचा तलाव भरून वाहू लागला असून सोबलेवाडीचा तलावही निम्म्यापेक्षा जास्त भरला आहे. सोबलेवाडीच्या तलावात मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून आणखी एखाद्या पावसानंतर हा तलावही ओव्हरफ्लो होईल.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणचे बंधारे नाले भरून वाहू लागले आहेत. पावसाने हुलकावणी दिलेल्या कान्हूरपठार भागातही पावसाने हजेरी लावल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाटाण्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठार भागातील शेतकऱ्यांनी वटाणा पेरणीची तयारी सुरू केली असून दोन वर्षांंच्या खंडानंतर या भागात मोठय़ा प्रमाणावर वटाण्याची पेरणी होण्याची चिन्हे आहेत. मुबलक पावसामुळे ओढे नाले वाहू लागले असून त्याचाच परिणाम म्हणून विहीरी बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठया प्रमाणावर कमी होऊ लागली आहे.
पारनेर शहराच्या सोबलेवाडी, कुंभारवाडी, बुगेवाडी या भागात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने कुंभारवाडीचा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्याच्याच खाली असलेल्या सोबलेवाडी तलावात त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून मान्सुन सुरू होण्यापुर्वीच हा तलाव भरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तलावाच्या खाली शहरास पाणीपुरवठा करणारी विहीर असून या विहीरीच्या पातळीतही झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने लवकरच तेथून शहरास पाणीपुरवठा सुरू होईल. सोबलेवाडीस जोडणारा रस्ता या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील दळणवळण प्रभावित झाले असून पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याचा राहिलेला काही भागही वाहून जाण्याची चिन्हे आहेत. याच वाडीतील शेरकर वस्तीस जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलही पावसामुळे वाहून गेला असून या रस्त्यावरील दळणवळणही प्रभावित झाले आहे. दोन्ही ठिकाणी मंगळवारी दुपारी युवक नेते अनिकेत औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख, सामाजिक कार्यकर्ते समीर आंबे, पाराजी औटी, माजी उपसरपंच व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय डोळ, विठठलराव औटी यांनी भेट देउन पाहणी केली. संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात येऊन रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना औटी यांनी दिल्या.
मंगळवारच्या पावसामुळे पारनेरच्या मनकर्णीका नदीवर उत्खनन केलेला आणखी एक बंधारा भरून वाहू लागला. सोमवारपर्यत चार बंधारे पुर्ण भरून वाहू लागले होत़े कान्हूर रस्त्यालगतचा बंधारा मंगळवारी सायंकाळी पुर्ण भरला. पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या दोन, तीन दिवसांत उर्वरीत तिनही बंधारे भरून वाहू लागतील असे चित्र आहे. पारनेर परिसरात सर्वात मोठय़ा असलेल्या हंगा तलावातही पाण्याची आवक सुरू झाली आहे.
बंधारे पाहण्यासाठी गर्दी
दुष्काळाचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आलेले आठ पैकी पाच बंधारे भरून वाहून लागल्याने ते पाहण्यासाठी पारनेरकरांनी मंगळवारी दिवभर मनकर्णिका नदीकाठी गर्दी केली होती. दुपारनंतर झालेल्या पावसामुळे कान्हूरपठार रस्त्यावरील बंधाऱ्यात झपाटयाने पाणी वाढून तो वाहू लागल्याचे पाहण्यासाठी अनेक नागरीक तेथे तळ ठोकून होते. सायंकाळी सहाच्या सुमारास हा बंधाराही वाहू लागल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

Story img Loader