कराड, पाटण तालुक्यात रिपरिप कायम
कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून कोयना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. शिगोशिग भरलेल्या कोयना धरणाचे ४ फूट उचललेले सहा वक्र दरवाजे आज सकाळी २ फुटांवर आणण्यात आले. सध्या धरणात सरासरी ३६ हजार २०२ क्युसेक पाण्याची आवक होत असून, कोयना नदी पात्रात १७ हजार ९३४ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. तर पायथा वीजगृहातून कोयना नदीत २ हजार १११ क्युसेक्स पाणी मिसळतच आहे. आज दिवसभरात धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाची रिपरिप कायम आहे.
दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे दरवाजे आणखी उघडण्याची तूर्तासतरी शक्यता नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास धरणातून त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य आहे. या पाश्र्वभूमीवर कोयना नदीकाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणाचा पाणीसाठा सध्या १०३.४१ टीएमसी म्हणजेच सुमारे ९८.२५ टक्के असून, धरणात आवक होणारे पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येऊन धरणाचा पाणीसाठा स्थिर ठेवण्याचा धरण प्रशासनाचा प्रयत्न कायम आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे कराड, पाटण तालुक्यातील जनजीवन काहीसे विस्कळीतच आहे. तर समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४.१२ टक्के पाऊस कमी झाला आहे. धरण क्षेत्रात सरासरी ४२८४ मि. मी. पाऊस झाला असून, गतवर्षी हाच पाऊस ५६४५.३३ मि. मी. नोंदला गेला आहे.
आज सकाळी ८ वाजता गेल्या २४ तासात धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ४०, एकूण ३७२३ मि. मी. नवजा विभागात ४६ एकूण ४५२० मि.मी तर महाबळेश्वर विभागात ५२ एकूण सर्वाधिक ४६०९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज दिवसभरात कोयनानगर विभागात ११, नवजा विभागात ८ तर महाबळेश्वर विभागात ५ मि. मी. एवढा नाममात्र पाऊस झाला आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार १६२ फूट १ इंच राहताना, पाणीसाठा १०३.४१ टीएमसी म्हणजेच सुमारे ९८.२५ टक्के आहे. कृष्णा, कोयना नद्या दुथडी भरून वाहत असून, खोडशी वळवणीच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे २ फुटांवर
कराड, पाटण तालुक्यात रिपरिप कायम कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून कोयना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. शिगोशिग भरलेल्या कोयना धरणाचे ४ फूट उचललेले सहा वक्र दरवाजे आज सकाळी २ फुटांवर आणण्यात आले.
First published on: 09-09-2012 at 01:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain drizzlerainfallpourdam water