अवकाळी वादळी पावसामुळे जिल्ह्य़ातील परतूर, तसेच घनसावंगी तालुक्यांत रब्बी पिकांचे नुकसान झाले. जालना शहरासह जिल्ह्य़ात शुक्रवारी सायंकाळपासून एकीकडे हवेतील गारवा वाढला असताना, ढगाळ वातावरणामुळे शनिवारी दुपारी बारापर्यंत शहरात सूर्यदर्शन घडले नव्हते.
शुक्रवारी रात्री नऊ च्या सुमारास परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेमोसमी वादळी पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कणसाच्या अवस्थेतील ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. गहू व हरभरा पिकांनाही फटका बसला. परतूर तालुक्यातील हातडी येथे वादळी पाऊस सुरू असताना वीज खांबावरील तारा तुटून बापूराव जाधव यांच्या घरावर पडल्या. घरात ठेवलेला १० क्विंटलपेक्षा अधिक कापूस या वेळी जळाला. घनसावंगी तालुक्यातील रांजवी, कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, अंतखाली टेंभी आदी गावांना पावसाचा फटका बसून रब्बी पिकांचे नुकसान झाले. तीर्थपुरी परिसरात गारांसह झालेल्या वादळी पावसाने फळबागांचे नुकसान झाले. खालापुरी, खटका, घुंगर्डे हदगाव, भणंग जळगाव, मुरमा, एकलहेरा इत्यादी गावांच्या परिसरात शुक्रवारी रात्री वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर कापसाच्या पिकाला लाल्यारोगाने ग्रासले आणि आता रब्बी पीक जोमदार बहरू लागले असतानाच, शुक्रवारी रात्री िहगोली व सेनगाव तालुक्यांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले.
अतिवृष्टीमुळे जून-जुल महिन्यांत सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जात नाही तोच सततच्या पावसाने सुमारे १ लाख ५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारदरबारी आहे. पीक नुकसानीचा मोबदला मिळावा, या साठी नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र, सरकारने केवळ जून-जुलच्या पीक नुकसानीपोटी ६ कोटी ३३ लाख निधी जिल्ह्यास देऊन बोळवण केली.
कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस काढून गहू, हरभरा, ज्वारी ही पिके घेतली. ही पिके चांगली बहरात असताना शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सेनगाव, िहगोली तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जमिनीवर आडवी होऊन नुकसान झाले. संत्रा, मोसंबी पिकांचेही मोठे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यातील खुडज येथील काहींच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले.
जालना, हिंगोलीत अवकाळी पाऊस
अवकाळी वादळी पावसामुळे जिल्ह्य़ातील परतूर, तसेच घनसावंगी तालुक्यांत रब्बी पिकांचे नुकसान झाले. जालना शहरासह जिल्ह्य़ात शुक्रवारी सायंकाळपासून एकीकडे हवेतील गारवा वाढला असताना, ढगाळ वातावरणामुळे शनिवारी दुपारी बारापर्यंत शहरात सूर्यदर्शन घडले नव्हते.
First published on: 19-01-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in jalna hingoli loss of fruit garden