मध्यंतरी काही दिवस गुंगारा दिलेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्यांना या पावसाने संजीवनी मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रीही रिमझीम स्वरूपात पडत होता. मंगळवारीही दिवसभर पावसाने ‘झड’ लावली.
सुरुवातीला काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अचानक उघडीप घेतली होती. आश्वासक व दमदार पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या. जमिनीत ओल नसल्याने शेतकरी पेरण्यांच्या मनस्थितीत नव्हते. तर जेथे कोठे पेरण्या झाल्या, तेथील शेतकऱ्यांचा जीव पावसाअभावी टांगणीला लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाळी वातावरणाने सर्व चित्रच बदलून टाकले आहे.
सोमवारी सायंकाळी रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर पावसाची झड सुरू होती. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस पडल्याचे वृत्त आहे. रात्रभर बरसलेल्या पावसाने सर्वत्र ओलेचिंब वातावरण आहे. शहरातही रस्त्यांवर पाणीच पाणी साठले असून, सध्याचा भीजपाऊस जेथे पेरण्या झाल्या, अशा भागात अधिक दिलासा देणारा ठरणार आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७७४ मिमी आहे. सोमवापर्यंतच्या पावसाने १०० मिमीचा आकडा ओलांडला. सोमवारी झालेल्या पावसाची आकडेवारी, कंसात या पावसाळ्यातील आतापर्यंतचा पाऊस – परभणी १२ (८८.५), पालम ८ (८६.५३), पूर्णा २२ (१५६.५०), गंगाखेड ७ (९४.५०), सोनपेठ १० (१५५.५०), सेलू १२ (१०५.०), पाथरी २८ (१३७.०), जिंतूर १५ (१०१.०३), मानवत ८ (९६.२३), परभणी जिल्हा १३.५६ (११३.३९).
मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसभर पावसाने हजेरी लावली. सध्याचा पाऊस पिकांसाठी दिलासा देणारा असून आणखी पावसाची आवश्यकता आहे. या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पावसाने झड लावल्याचा अनुभव आहे.
परभणीत सर्वदूर पाऊस, बळीराजा सुखावला
मध्यंतरी काही दिवस गुंगारा दिलेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्यांना या पावसाने संजीवनी मिळाली आहे. मंगळवारीही दिवसभर पावसाने ‘झड’ लावली.

First published on: 26-06-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in parbhani respite to farmer