सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात सोनपावलाने बुधवारी आलेल्या गौराईसोबत परतीच्या मान्सूननेही हजेरी लावली. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा, खानापूर परिसरात परतीच्या मान्सूनने हजेरी लावली असली तरी, पावसासाठी आसुसलेल्या आटपाडीला मात्र वगळले.
गणपतीच्या आगमनानंतर सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. जत, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, विटा, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूत गेले तीन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पूर्व भागात बऱ्यापकी पावसाने  हजेरी लावली. सकाळपासून असह्य उकाडय़ाने पावसाची वर्दी दिली होती. दुपारनंतर  या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
सांगली-मिरज शहरात पावसाच्या हलक्या सरी दुपारी झाल्या. त्यानंतर सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. शहरात डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भरण्याचे काम गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने हाती घेतले आहे. रिमझिम पावसानेच पुन्हा सगळीकडे जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, इस्लामपूर, शिराळा परिसरात मात्र बुधवारी केवळ ढगाळ हवामान होते.

Story img Loader