यावर्षी पावसाळय़ात आतापर्यंत ७०० घरांची पडझड झाली आहे. ४० घरे पूर्णत: पडल्याने शेकडो लोक बेघर झाले असून तीन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेण्यात आली आहे. दरम्यान, पावसाळय़ात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी खाते तसेच व्यवस्थापन कक्षात त्याची नोंद नाही.
यंदा जून महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला असून जवळपास ७०० घरांची पडझड झाली आहे. नदी काठावरील लोकांना पूर परिस्थितीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र हा कक्ष केवळ कागदोपत्री माहिती गोळा करण्यात गुंतलेला आहे. यावर्षी आतापर्यंत आतापर्यत या पावसाळय़ात ६३५ अंशत: तर ४० घरे पूर्णत: पडली असून तीन लोक मृत्युमुखी पडले. पुरात शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती कक्षाकडे नसल्याने याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्हय़ात पावसाळय़ात काही गावांना पुराचा फटका बसत आहे. आपत्तीपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरी प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी अशा कुठल्याही प्रकारची तयारी, योग्य नियोजन प्रशासनाकडे नसल्याने मोठय़ा प्रमाणात पूर परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीला हाताळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा शासनाच्या वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याच करण्यात न आल्याने याचा परिणाम या कामावर झालेला आहे. राज्याच्या महसुल व वनविभाग या खात्यामार्फत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले जाते. जिल्हय़ाच्या ठिकाणी मुख्य नियंत्रण कक्ष तयार करण्यात येतो. हा कक्ष तालुक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी सबंध ठेऊन कामाचा आढावा घेत असतो. जिल्हय़ातील सर्व संपर्क यंत्रणा सुस्थितीत आहेत याची खात्री करणे, जिल्हय़ातील विविध कक्षातुन माहिती गोळा करणे, आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ात वेळोवेळी आवश्यक ते बदल करणे, बदलाची माहिती, कृती आराखडा यशदाकडे पाठवणे, जिल्हय़ातील विविध शासकिय वा अशासकिय विभागासाठी प्रशिक्षण घेणे, आपत्ती नंतर केलेल्या उपायांचे मुल्यमापन करणे, जिल्हा स्तरावर आपत्तीजनक घटणांची माहिती गोळा करणे, गोळा केलेली माहिती आपात्कालीन कृती केंद्राकडे पाठवणे आदी कामे जिल्हा नियंत्रण कक्षाला करायची असतात. मात्र स्थानिक प्रशासनाक डून पाहिजे तशी कामे केली जात नसल्याचे दिसून येत आहे. आपत्ती पासून बचाव करण्यासाठी लागणारी यंत्रणाही कमकुवत आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या बचाव पथकात केवळ १३ लोक आहेत. या संख्येचा विचार करता संपुर्ण जिल्हय़ासाठी ही अपुरी आहे.
यंदा कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले नाही. केवळ कागदोपत्री काम सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. या विभाकडे असलेल्या सामुग्री बाबतही संभ्रमीत करणारी माहिती या विभागातील अधिकारी देत आहेत.
पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीची शक्यता वर्तवली   जात आहे. मात्र अशाही परिस्थितीत कृषी खाते किंवा आपत्ती व्यवस्थापनाकडे  या नुकसानीची नोंदणी झालेली नाही.

Story img Loader