नगर शहरासह परिसरात रिमझिम तर श्रीरामपूरमध्ये सुमारे तासभर जोरदार स्वरूपात रविवारी पावसाने हजेरी लावली. थंडीही गायब झाली आहे. दिवसभराच्या ढगाळ वातावरणाने नगरमध्ये तर दुपारीच अंधारून आल्यासारखी परिस्थिती होती.
 नगरमध्ये तापमानाचा पारा गेले तीन दिवस चांगलाच घसरला होता. परंतु कालपासून काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात थोडी वाढ झाली, मात्र पहाटे व सकाळी थंडीचा कडाका जाणवला. सकाळी ढग जमू लागल्याने थंडी गायब झाली. सकाळीही काही वेळ पावसाचे थेंब पडले. दुपारनंतर पाऊस केव्हाही सुरू होईल, अशीच परिस्थिती होती. चारच्या सुमारास रिमझिम स्वरूपात पाऊस झाला, मात्र केवळ रस्ते ओले करूनच तो थांबला. पावसाळय़ात पाऊस झाला की शहरातील वीज काही वेळ तरी गायब होत असते, थंडीतील पावसानंतरही लगेच वीज खंडित झाल्याचा अनुभव नगरकरांना मिळाला. नगर तालुक्यातील काही गावांतही पावसाने किरकोळ हजेरी लावली. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे कापूस, कांद्याचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. मात्र ज्वारी, गहू, हरभरा यासाठी मोठा पाऊस उपयुक्त होणार आहे.
श्रीरामपूरमध्येही कडाक्याची थंडी गायब होऊन आज पावसाने हजेरी लावली. दुपारी काही वेळ रिमझिम व नंतर सुमारे तासभर श्रीरामपूर, बेलापूर, रामगड परिसरात जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवडय़ात थंडीचे आगमन झाले होते. दिवसाही हवेत गारठा जाणवत होता, पण आंध्र प्रदेशात आलेल्या ‘हेलन’ वादळाचा परिणाम जाणवला. कालपासून थंडी गायब झाली. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. यंदाच्या थंडीत प्रथमच पाऊस पडला. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे किरकोळ स्वरूपाच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे.

Story img Loader