घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा.. या गाण्याचा प्रत्यय बुधवारी संध्याकाळी घडला. एकाच वेळी कोसळणाऱ्या जलधारा, मध्येच टपोऱ्या गारा व चक्क ऊनही, असा त्रिवेणी सुखद अनुभव औरंगाबादकरांनी घेतला. केवळ १५ मिनिटेच हा नजारा टिकला. परंतु एवढय़ाशा वर्षांवातही वातावरणाचा नूर पालटून गेला. हिवाळा आता पूर्ण सरला आणि उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसराला चिंब भिजवून टाकले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, गारखेडा, जालना रस्ता, बाबा पंप, सिडको, वाळूज महानगर, सातारा परिसर, नवजीवन कॉलनी, टीव्ही सेंटर, बीड बायपास आदी ठिकाणी १०-१५ मिनिटे गारांसह पाऊस पडला. हिंगोली, परभणीसह मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी गारांसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, आंब्यासह शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर गेले काही दिवस आकाशात ढगांचे पुंजके दिसत होते. मात्र, ढग लगेच विरूनही जात असल्याने पावसाचा मागमूस तसा नव्हताच. तसेच दिवसाच्या तापमानातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. बुधवारी संध्याकाळी अवकाळी पावसाचे थेंब पडू लागले आणि पावसाचा जोर एकदम वाढला. याच वेळी बोराएवढय़ा आकाराच्या गाराही टपटप पडू लागल्या आणि सगळीकडे गारा वेचण्यासाठी लहान मुलांसह मोठेही घराबाहेर पडले. मोबाईलमध्ये गारांचा फोटो टिपण्याचा आनंदही अनेकांनी घेतला. या दरम्यान पाच मिनिटे काही अंतरावरचे दिसूही नये, इतपत पावसाचा जोर वाढला. पाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस १२-१५ मिनिटेच टिकला. पाऊस संपण्याच्या टप्प्यात सूर्यनारायणाचे दर्शन घडले. पाऊस थांबल्यावर मात्र नेहमीप्रमाणे लख्ख सूर्यप्रकाश पसरला होता. परंतु पावसाची मोठी सर पडल्यानंतर सूर्यप्रकाशात चमकणारा आसमंत वेगळीच अनुभूती घडवून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain with cold in aurangabad