ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका
ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय साहित्य तब्बल दीड महिना उशिराने मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने उशिराने निविदा प्रक्रिया सुरू केली. निवडणुका आटोपल्या, आचारसिहताही संपली. त्यानंतर यासंबंधीची निविदा प्रक्रिया उरकण्यात आली खरी, मात्र गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे यासंबंधी प्रस्ताव आणण्यात पुन्हा एकदा दिरंगाई झाल्याने जून आणि जुलै असे पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट पडणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या सर्वच शाळा सुरू झाल्या असून या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेल्या पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, महापालिकेमार्फत मिळणारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळू शकलेले नाही. दरवर्षी शाळा सुरू होताच महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्य़ा, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा जून महिना उलटत आला तरी अंतिम मंजुरीच्या टप्प्यातच आहे. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शालेय साहित्य वाटपाच्या निविदे प्रक्रियेस उशीर झाल्याचे कारण महापालिका प्रशासन पुढे करत आहे. मात्र, लोकसभा निवडणुका यंदाच्या वर्षी होणार आहेत, याची माहिती महापालिका प्रशासनाला होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वेळेवर उरकून विद्यार्थ्यांची सोय पाहणे गरजेचे होते. प्रत्यक्षात ही सगळी प्रक्रिया तांत्रिक फेऱ्यांत सापडल्याने विद्यार्थ्यांना साहित्य वेळेवर मिळणार नाही, असे चित्र आहे.
शालेय साहित्य वाटपाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे उद्या, गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधरण सभेच्या विषय पटलावर मंजुरीसाठी येईल, अशी आशा होती. मात्र, या सभेच्या विषय पटलावर निविदा मंजुरीचा विषय येऊ शकलेला नाही. त्यामुळे या निविदेच्या मंजुरीसाठी आता जुलै महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेची वाट पाहावी लागणार आहे. तसेच निविदा मंजुरीनंतर ठेकेदाराकडून साहित्याची खरेदी, त्याचे वितरण आणि वाटप, या सर्व प्रक्रियेसाठी साधारणत: एक महिन्याचा अवधी जाणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमुळे निविदा प्रक्रियेस उशीर झाल्यामुळे शालेय साहित्य वाटप होऊ शकलेले नाही. मात्र, निविदा प्रक्रिया मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळेल, असा दावा महापालिकेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा