तीन दिवसांच्या उघडपीनंतर वरूणराजाने सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी हजेरी लावली. दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहर पुन्हा जलमय झाले. तर पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात सातत्य राहिले. मृग नक्षत्रापासून पावसाने जोर धरला होता. आठवडाभर पावसाचे कमी अधिक प्रमाण होते. त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. नंतर पुन्हा तो तीन दिवस पडत राहिला. मात्र गेल्या तीन दिवसांच्या विश्रातीनंतर आज शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले.    
पावसाने उघडीप दिल्याने हवेतील उष्मा काही प्रमाणात वाढला होता. आज दुपारपर्यंतही अशीच स्थिती होती. मात्र दुपारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी तीन-चार वेळा आल्या. या पावसामुळे शहर पुन्हा एकदा जलमय झाले. मागील रविवारीही सुट्टीनंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्याची पुनरावृत्ती आजही पावसाने केली. यामुळे विक एंडचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरवासीयांच्या प्रयत्नावर पाणी फिरले. दरम्यान गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी, चंदगड या डोंगराळ भागात चांगला पाऊस झाला. शिरोळ, हातकणंगले, कागल येथे पावसाची एखादी सर येऊन गेली. अन्य तालुक्यांतही तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Story img Loader