जिल्हय़ात बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने हस्त नक्षत्रातच वार्षकि सरासरीचा टप्पा गाठला. जिल्हय़ाची वार्षकि सरासरी ८०२ मिमी असून, गुरुवारी सकाळी आठपर्यंत पावसाने ७९९.२७ मिमी सरासरी गाठली.
रेणापूर, उदगीर, अहमदपूर, जळकोट व देवणी तालुक्यांनी वार्षकि सरासरीचा टप्पा आधीच पार केला. देवणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. आतापर्यंत तालुक्यात ९०८.६२ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल अहमदपूर ८९६.९२, उदगीर ८६१.३८, जळकोट ८३२, रेणापूर ८०८.९६, शिरूर अनंतपाळ ७८७.९४, निलंगा ७८६.५०, तर चाकूर तालुक्यात ७५४.४० मिमी पाऊस झाला.
औसा व लातूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. लातूर ६८२.३४, तर औसा तालुक्यात ६७३.२८ मिमी पाऊस झाला. बुधवारी संध्याकाळी सातनंतर तासा-तासाच्या अंतराने पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. निलंगा, अहमदपूर, देवणी व शिरूर अनंतपाळ, रेणापूर, लातूर तालुक्यात दमदार, तर उदगीर, औसा, चाकूर तालुक्यात भीज स्वरूपात पाऊस झाला. गेल्या १० दिवसांपासून जिल्हय़ात सातत्याने पावसाची हजेरी सुरू असल्यामुळे सोयाबीनच्या राशी चांगल्याच खोळंबल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून काही शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीचा पेरा केला आहे. सततच्या पावसामुळे ज्वारीची निसवलेली कणसेही काळी पडत आहेत. त्यामुळे याहीवर्षी काळय़ा ज्वारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाला खंड नसल्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्यास उसंतच मिळत नाही व पावसामुळे शेतात तण जोमाने वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहतो आहे.