राज्यात पावसाळी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिरातबाजीत सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाचा पूर्णपणे विसर पडला असून पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करू शकणारी अनेक स्थळे असूनही त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. पर्यटन विभागाच्या पावसाळी पर्यटनविषयक जाहिरातीत महाबळेश्वर, माथेरान, माळशेज, लोणावळा, चिपळूण, इगतपुरी, भंडारदरा आणि अंबोली या पर्यटन स्थळांचाच उल्लेख आहे. मात्र, विदर्भातील निसर्गरम्य स्थळांना पूर्णपणे वगळण्यात आल्याने पर्यटकांमध्ये आश्चर्य आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा प्रकार घडला आहे.
मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये पावसाळी पर्यटनासाठी अनुकूल अशी अनेक ठिकाणे असताना सुविधा नसल्याने ही पर्यटनस्थळे विकसित होऊ शकली नाहीत. चिखलदऱ्याचा मोहीत करणारा भीमकुंडचा धबधबा, अजस्त्र धारांचा यवतमाळ जिल्ह्य़ातील सहस्त्रकुंड धबधबा, गोंदिया जिलतील हाजरा फॉल, अशी अनेक ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीत न्हाऊन निघतात, पण सुरक्षेच्या दृष्टीने आणि पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवण्याच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला जात असल्याचे चित्र आहे.
पावसाळयात उंच कडय़ांवरून झेपावणाऱ्या धारांमध्ये आणि धबधब्याखाली मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतात. यंदाच्या अतिवृष्टीने तर अनेक ठिकाणांचे निसर्गसौंदर्य प्रचंड बहरलेले आहे. मेळघाटच्या पायथ्याशी गुल्लरघाट रस्त्यावर असलेला सूर्या धबधबा, धारखोरा किंवा चिचाटी हे धबधबे अजूनही सर्वसामान्य पर्यटकांसाठी अडचणीचेच ठरले आहेत. पर्यटक तरीही या ठिकाणी पोहचण्यासाठी  उत्सूक असतात, गोंदिया जिल्ह्य़ातील ढासगड किंवा दरेकसा जवळील हाजरा फॉलवर पर्यटकांची गर्दी होत आहे, पण पर्यटकांच्या वाटय़ाला असुविधाच अधिक येत आहेत. विदर्भातील ही स्थळे विकसित करण्यासाठी हालचाली करण्याऐवजी राज्यातील इतर भागातच पावसाळी पर्यटनासाठी वाव असल्याची ठाम समजूत पर्यटन विभागाने करून घेतली आहे.
अकोट ते हरीसाल मार्गावरील कडय़ांवरून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर घेण्यासाठी दूरदूरून पर्यटक येतात. पण पर्यटकांना प्रत्येक टप्प्यांवर अडचणींचाच सामना करावा लागत असल्याने त्यांचा हिरमोड होतो. अकोटपासून जवळच असलेल्या खटकालीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील सूर्या धबधब्यावर (सुलई नाला) गर्दी होत आहे,पण  पर्यटकांना या ठिकाणी स्वत:चे वाहन घेऊन जाण्यावाचून पर्याय नसल्याने हे स्थळ सर्वसामान्य पर्यटकांसाठी आडवळणाचेच ठरले आहे. शिवाय या ठिकाणी सुरक्षेची हमी नाही. असामाजिक तत्वांचाही वावर वाढल्याचे अलीकडच्या काही घटनांमध्ये दिसून आले आहे.
चिखलदरा मार्गावरील बुरडघाट फाटय़ापासून ५ किलोमीटर जंगलातून पायी गेल्यावर धारखोरा हा नयनरम्य धबधबा नजरेस पडतो. निसर्गरम्य असे हे ठिकाण असूनही दुर्लक्षित आहे. केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर उन्हाळ्यातही हा धबधबा थांबत नाही. पण या ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शक फलक नाहीत. सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेला चिचाटीचा धबधबा देखील दुर्गम असून ३०० फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा अजूनही दुर्लक्षित आहे.
धारणी तालुक्यातील राणीगाव कंजोलीचा धबधबा,  गोंदिया जिल्”ाातील सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल, देवरी तालुक्यातील ढासगड हे पावसाळी पर्यटनासाठी लोकप्रिय अशी ठिकाणी असताना पर्यटन विभागाचे मात्र या स्थळांची दखलही घेतेली नाही. विदर्भातील लोकप्रतिनिधींची अनास्था यासाठी कारणीभूत मानली जात आहे. ‘मार्केटिंग’ अभावी विदर्भातील सरस अशा ठिकाणांकडे  दूरवरच्या पर्यटकांना आकर्षित करण्यात अपयश येत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पावसाळी पर्यटनासाठी अनुकूल अशा ठिकाणांच्या विकासासाठी निधीची तरतूद नसल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा