गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रायपूर ते मातला रस्त्याचे काम बंद पडले आहे. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे एस.टी.महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना दूरवर पायपीट करण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. नागरिकांसह विद्यार्थ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एस.टी.महामंडळाने रायपूर मार्गे बुलढाणा ते मातला ही बससेवा सुरू केली होती. या बससेवेचा फायदा पांगरी, नांद्राकोळी, साखळी रायपूर, सिंदखेड व मातला ग्रामस्थांना होत होता. परंतु, गेल्या काही वर्षांंपासून रायपूर ते मातला या रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर दूरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून गिटृी उघडी पडली होती. त्यामुळे या रस्त्यावरून चालतांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एका ठेकेदारास देण्यात आले. परंतु, चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने मनमानी कारभार करून या रस्त्याचे काम बंद केले आहे.
रस्त्याच्या आजूबाजूला दगड व गिट्टीचे ढीग पडलेले आहेत. हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे एस.टी.महामंडळाने रायपूर मार्गे बुलढाणा ते मातला बससेवा बंद केली आहे. परिणामी, बुलढाणा ते मातला ही बस फक्त पांगरीपर्यंतच येत आहे. त्यानंतर ही बस केसापूर मार्गे मातला येथे जाते त्यामुळे रायपूर, पळसखेड भट, पिंपळगाव सराई व सैलानी येथील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
वास्तविक, मातला येथील असंख्य विद्यार्थी दररोज शिकवणी, संगणक शिक्षण व इतर शिक्षणासाठी बुलढाणा येथे जातात. या विद्यार्थ्यांनी बसेसच्या पासेस सुध्दा काढल्या आहेत. परंतु, बसेस बंद असल्यामुळे या पासेस निकामी ठरत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. पासेस काढूनही अनेक विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे पांगरी हे गाव गाठावे लागत आहे. नागरिकांसह विद्यार्थ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू करून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ठेकेदाराच्या मनमानीमुळे रायपूर-मातला रस्त्याचे काम ठप्प
गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रायपूर ते मातला रस्त्याचे काम बंद पडले आहे. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे एस.टी.महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना दूरवर पायपीट करण्याची वेळ आली आहे.
First published on: 15-06-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raipur matla road work stuck due to arbitrary of contractor