लोकसहभागातून जिल्ह्य़ात १० हजार वनराई बंधारे तयार करण्याचा कार्यक्रम जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी हाती घेतला आहे. यापैकी ३ हजार ४११ वनराई बंधाऱ्यांच्या जागांची निवड केली असून ५३३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ते होणार आहेत. पैकी पहिल्या बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ नुकताच झाला.
जिल्ह्य़ात एकूण ७८१ ग्रामपंचायती असून त्यांच्या हद्दीत सुमारे १ हजार वनराई बंधारे तयार करायचे असले तरी त्यासाठी सरकारचा कोणताही निधी लागणार नाही. त्यासाठी फक्त आवश्यक खतांच्या किंवा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या लागणार आहेत. चालू खरीप हंगामाचा विचार केल्यास जिल्ह्य़ात १ लाख ५ हजार मेट्रिक टन खतांची विक्री झाली. त्यामुळे २१ लाख रिकाम्या गोण्या उपलब्ध होऊ शकतात. सध्या नियोजन केलेल्या ३ हजार ४११ वनराई बंधाऱ्यांसाठी जवळपास ६ लाख रिकाम्या गोण्या लागतील. आतापर्यंत २ लाख गोण्या जमा झाल्या आहेत. गावपातळीवर शेतकरी कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ ते ५ रिकाम्या गोण्या आणून देण्याचे आवाहन केले आहे. रासायनिक खत विक्रेते, कारखानदार व अन्य संस्थांनाही रिकाम्या गोण्या देण्याचे आवाहन केले आहे. गावपातळीवरील जि. प. कर्मचारी, शिक्षक आदींच्या समन्वयातून या कार्यक्रमात स्थानिक लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. वनराई बंधाऱ्यांसाठी जागा निश्चित करण्याचे काम स्थानिक ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीमार्फत करायचे आहे.
गावपातळीवरील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामरोजगार सेवक आदींनी लोकांचा सहभाग घेऊन श्रमदानाने प्रत्येकी एक किंवा दोन बंधारे तयार करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्यात येणार आहे. समन्वय व नियंत्रणासाठी पाच गावे एका पर्यवेक्षीय अधिकाऱ्याकडे सोपविली आहेत. कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता आदींकडे हे काम सोपविले आहे. येत्या १५ ऑक्टोबपर्यंत पावसाच्या स्थितीनुसार हे बंधारे पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.

Story img Loader