अवघड वळणाचा फोफसंडीचा घाट… त्यातून जाणारी चढउताराची बिकट वाट, तीही दाट धुक्यात हरवलेली… आषाढ सरी बेभान कोसळताहेत… ओढय़ानाल्यांच्या वेगवान प्रवाहाने रस्त्यांची काही ठिकाणी वाताहत झालेली… वातावरणात प्रचंड गारठा… निसर्गशक्तींचा अशा आव्हानांशी मुकाबला करीत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड भल्या सकाळीच दुर्गम फोफसंडीत दाखल झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे धास्तावलेल्या फोफसंडीकरांना मंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीने मोठाच धीर आला.
फोफसंडी हे तालुक्यातील तीन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यामुळे तालुक्याशी जोडले गेले. हरिश्चंद्र अतिदुर्गम खेडे. चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या मधल्या खोलगट जागेत विसावलेले. तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेले हे गाव. या डोंगररांगांत गेल्या महिनाभरापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे फोफसंडी गावाच्या दक्षिणेकडील तिवईच्या डोंगराचा मोठा भाग कोसळला. कोसळलेल्या दरडींचा राडारोडा, फोफसंडी ते कोपरे रस्त्यावर पसरून काही भाग घरंगळत थेट मांडवी नदीपर्यंत पोहोचला. या दरडी कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद होऊन पुणे जिल्ह्याशी असणारा फोफसंडीचा संपर्क तुटला. हे भूस्खलन झाले त्याच्या काहीसे अलीकडे डोंगरावर वसलेल्या घोडेवाडीनजीक याच डोंगरावर ८० फूट लांबीची भेग पडली आहे. सततच्या पावसाने तो भाग खचण्याच्या भीतीने घोडेवाडीतील २०-२२ कुटुंबे भेदरलेली आहेत. त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. याच कारणाने मंत्री पिचड तेथे पोहचले.
भर पावसात निसरडय़ा झालेल्या रस्त्यावरून चिखलातून वाट तुडवत पिचड यांनी पायी फिरत या सर्व परिसराची पाहणी केली. आपत्तीचे स्वरूप व संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेला आपद्ग्रस्तांना तातडीने मदत व त्यांचे सुरक्षित जागी तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मोठय़ा संख्येने जमलेल्या गावक-यांच्या व्यथा जाणून घेताना त्यांना धीरही दिला. विविध सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळतात की नाही याची खातरजमा त्यांनी लोकांकडून करून घेतली. गावातील प्रत्येक कुटुंबाला खावटी द्या, शाळेच्या इमारतीचे निर्लेखन करा व शाळेसाठी नवीन इमारत बांधा अशा सूचना त्यांनी केल्या. लोकांची सुखदु:खे जाणून घेतानाच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा तसेच नदीवर मोठा बंधारा बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना अधिका-यांना देत लोकांच्या आशाही त्यांनी जागवल्या.
उपस्थितांची आस्थेवाईकपणे विचारपूस करताना त्यांनी दिलेले धीराचे शब्द ऐकून गावक-यांना आधार मिळाल्याचे दिसत होते. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणा-या फोफसंडीकरांचा प्रश्न मार्गी लावून गावक-यांचे समाधान झाल्यानंतरच त्यांनी फोफसंडीचा निरोप घेतला. नंतर अगस्ती कारखान्याची बैठक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा खो-यातील समशेरपूरला रवाना झाले. तेथे विविध विकासकामांची उद्घाटने आणि सभा असा भरगच्च कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गाडय़ांचा ताफा पट्टाकिल्ला परिसरातील बिताका या दूर्गम गावी पोहचला. बिताका गावाच्या परिसरात पिचड यांच्या प्रेरणेतून लोकसहभागातून जलसंधारणाचे, तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी मोठे चर खोदून आढळा खो-यात वळविण्याचे काम सुरू आहे. तुडुंब भरलेले चर आणि भरलेल्या चरातून झुळझुळ वाहणारे पाणी आढळा खो-याच्या दिशेने येताना पाहन कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. बिताक्याची भेट आटपून सायंकाळी त्यांची गाडी म्हैसवळण घाट उतरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
या वयात अशा वातावरणात एवढी धावपळ आपण केली, करता यामागील प्रेरणा काय असे फोफसंडीच्या भेटीत त्यांना थेट विचारले असता ते म्हणाले, अडचणीतील लोकांना मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत गोरगरीब माणसे इतके अडचणीत असतात की त्यांचे दु:खच मला इकडे खेचून आणते. शेवटी लोक हीच माझ्या कामाची प्रेरणा व तीच माझी ऊर्जा आहे अशी काहीशी भावनिक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
मंत्री पिचड यांच्या भेटीने फोफसंडीकरांना बळ !
आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड भल्या सकाळीच दुर्गम फोफसंडीत दाखल झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे धास्तावलेल्या फोफसंडीकरांना मंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीने मोठाच धीर आला.
First published on: 03-08-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raised spirit of phophsandikar due to madhukar pichads visit