‘मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे पडत चालला असून निपुत्रिक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ज्या काही अनाथालयातून बालके दत्तक घेण्यात आली त्यात मुलींचेच प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
दत्तक घेण्याचा प्रकार शेकडो वर्षांंपासून सुरू आहे. यात प्रामुख्याने मुलांचाच समावेश अधिक राहायचा. संपत्ती आहे, परंतु वारस नाही. त्यामुळे आपला वारसा चालत राहावा, हा यामागे हेतू होता. समाजात एका बाजूने निपुत्रिक दाम्पत्यांची संख्या वाढत असतानाच गरिबीमुळे किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ सोडून देण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशी बेवारस मुले मग बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. दत्तक घेण्याच्या प्रवृत्तीतही बदल घडून येत आहे. एक मूल असताना दुसरे मूल दत्तक घेतले जात आहे. मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहेत, परंतु निपुत्रिकांना मुले दत्तक देण्यास अनाथालय प्राधान्य देतात.
नागपूर जिल्ह्य़ात एकूण आठ अनाथालये आहेत. यातून दत्तकविधान केले जाते. दत्तक घेणारे दाम्पत्य मुलगी किंवा मुलाचा वर्ण गोरा असावा, त्याचे आरोग्य सुदृढ व तो गोंडस असावा, याकडे अधिक लक्ष देतात. एक ते तीन वर्षे वयाच्या मुलांना अधिक पसंती असते. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत श्रद्धानंद अनाथालयातून ३० मुले आणि मुली दत्तक देण्यात आली. त्यात १६ मुलींचा आणि १४ मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एका सख्ख्या बहीण-भावाला एकाच दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. सध्या ५० निपुत्रिकांचे अर्ज प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती श्रद्धानंद अनाथालयाच्या बालगृह विभागप्रमुख ललिता गावंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मुली सर्वच बाबतीत आघाडीवर आहेत. मुलगी आणि मुलगा, असा भेदही कमी झाला आहे. त्यामुळे दत्तक घेणारे दाम्पत्य आधी मुलीचीच मागणी करतात. मुलगा किंवा मुलगी दत्तक देताना आयकर भरणाऱ्या दाम्पत्यांनाच पहिली पसंती दिली जाते. याशिवाय, जे दाम्पत्य एक मूल असताना दुसरे मुल दत्तक घेऊ इच्छितात त्यांना श्रद्धानंद अनाथालय मूल देण्यास नकार देते, असेही गावंडे यांनी सांगितले.
इंदोरा चौकातील बालआश्रय संस्थेच्या व्यवस्थापिका पौर्णिमा शास्त्रकार म्हणाल्या, बेवारस सापडणाऱ्यांमध्ये मुलींचीच संख्या अधिक असते. अनाथालयात दाखल होणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण कमी असल्याने मुलीच मोठय़ा संख्येने दत्तक दिल्या जातात. समाजाचीही मुलींच्या बाबतीतली मानसिकता बदलली आहे. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट मागे पडला आहे. मुलगाच हवा, असे म्हणणारे निपुत्रिक दाम्पत्य आमच्याकडे येतात, परंतु त्यांची संख्या फारच कमी असते. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत बालआश्रय या संस्थेतून १० मुले-मुली दत्तक देण्यात आली. त्यात ७ मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. आणखी पंधरावर दाम्पत्य प्रतीक्षा यादीत आहेत. आमचे अनाथालय लोकाश्रयावर चालते. दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यांकडून शासनाने ठरवून दिलेले शुल्क घेतले जाते. मूल दत्तक देताना त्या मुलाची खरोखरच काळजी घेतली जाईल का, याची खात्री करून व कायदेशीर प्रक्रिया करूनच मूल दत्तक दिले जात असल्याचेही शास्त्रकार यांनी सांगितले.
दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याला मान्यताप्राप्त संस्थेत नोंदणी करावी लागते. शिवाय, मालमत्ता, नातेवाईक व इतर माहिती द्यावी लागते, तसेच बाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी असल्याचे पत्र व इतर अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिले मूल असताना दुसरे मूल दत्तक घ्यायचे असल्यास त्याची कारणेही विशद करावी लागतात. या प्रक्रियेला जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. संस्थेतर्फे बाळ स्वाधीन करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रथम दाम्पत्याच्या घरी भेट देऊन संपूर्ण माहिती गोळा केली जाते. त्यानंतर न्यायालयात अर्ज सादर करून न्यायालयाच्या निर्देशानुसार बाळाला दाम्पत्याच्या ताब्यात दिले जाते. दोन महिन्यानंतर दाम्पत्याच्या घराला पुन्हा भेट देऊन अहवाल तयार करण्यात येतो. हा अहवाल छाननी समितीकडे पाठवला जातो. समितीकडून ना-हरकत येताच अंतिम आदेशासाठी न्यायालयात पाठवला जातो. न्यायालयाने अंतिम आदेश देताच दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजले जाते, अशी माहितीही शास्त्रकार यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा