कल्याण परिसरात दोन आमदार, महापालिकेत २७ नगरसेवक, विरोधी पक्षाचे नेतेपद आणि शिवसेना-भाजप युतीचा महापालिकेतील भोंगळ कारभार यामुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय पर्याय म्हणून ठसठशीतपणे पुढे आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या शहकाटशहाच्या राजकारणामुळे खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने पक्षातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
शासकीय निधीतून विकास कामे करताना या शुभारंभ सोहळ्याचे साधे शिष्टाचार मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना पाळणे जमले नाही. विकासाचे श्रेय घेताना ताठ मानेने घ्या असा राज यांचा पदाधिकाऱ्यांना नेहमीच सल्ला असतो. हा सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरविताना आपल्याच आत्मप्रौढीत गर्क असलेल्या आमदार महाशयांची राज ठाकरे यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याची चर्चा आता रंगली असून याविषयी आमदार भोईर यांनी मात्र अशाप्रकारे काहीही झालेले नाही, असा खुलासा पत्रकारांकडे केला आहे.
मनसेने आयोजित केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन रद्द करण्यासाठी शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाने राजकीय आणि शासकीय यंत्रणेचे बळ वापरले. कल्याण डोंबिवलीत मनसेतील पक्ष संघटना आणि महापालिकेतील नगरसेवकांमध्ये अनेक गटतट आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद असूनही सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होण्यातच या पक्षाचे ठरावीक नगरसेवक कसे मग्न असतात हे यापूर्वीच दिसून आले आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते उल्हास भोईर यांची पदाची मुदत संपली तरी त्यांना मुंबईतील नेत्यांकडून पाठबळ दिले जात आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करा या मागणीसाठी पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनीच सह्य़ांची मोहीम हाती घेतली. शहराध्यक्ष राजेश कदम यांनी ४६ कोटी रुपयांच्या युटिलिटी प्रस्तावावरून महापालिकेला दिलेले पत्र आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उडालेला गोंधळ सर्वश्रुत आहे. मुंबईतील नेते नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, संपर्कप्रमुख सुनील जाधव यांच्या आश्रयाने शहरातील काही मनसे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते वावरत असल्याने आतापर्यंत एकसंधपणे वावरणारी मनसेची संघटना गटातटांत विभागून खिळखिळी झाल्याचे चित्र रविवारी राज ठाकरे यांच्या नजरेतून सुटले नाही.
कल्याण डोंबिवली पालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही आक्रमक विरोधी पक्ष म्हणून मनसेला ठसा उमटविता आलेला नाही. रविवारी कल्याणच्या दौऱ्यासाठी आलेले राज ठाकरे यांनी याच मुद्दयावरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे. शिवसेनेपाठोपाठ २७ नगरसेवकांचे मोठे संख्याबळ हाताशी असूनही महापालिकेत या पक्षाला स्वतचे अस्तित्व निर्माण का करता येत नाही, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीतील भाजपच्या बालेकिल्ल्यांना गेल्या निवडणुकीत मनसेने िखडार पाडले. त्यानंतर डोंबिवलीत मनसे स्वतचा ठसा उमटवेल अशी अपेक्षा येथील रहिवाशांना होती. प्रत्यक्षात तसेच होत नसल्याची नाराजी खुद्द राज ठाकरे यांनी व्यक्त केल्याने रविवारचा दिवस स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांसाठी चिंता वाढविणारा ठरला आहे.
राज ठाकरेंच्या खरडपट्टीने मनसेत अस्वस्थता
कल्याण परिसरात दोन आमदार, महापालिकेत २७ नगरसेवक, विरोधी पक्षाचे नेतेपद आणि शिवसेना-भाजप युतीचा महापालिकेतील भोंगळ कारभार यामुळे
First published on: 26-11-2013 at 06:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray also expressed displeasure for his leaders bad work