दलित नेत्यांच्या विरोधात अवमानकारक भाषा उच्चारल्याच्या निषेधार्थ ५४ संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. विवेकानंद चौकातून दुपारी साडेअकरा वाजता निघालेल्या मोर्चात महिला, तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या वेळी चोख पोलीस व्यवस्था होती. मुख्य रस्त्यावरून मोर्चा निघाल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कुचंबणा झाली. इंदू मिलची जागा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास त्वरित द्यावी. राज ठाकरे यांनी दलित नेत्यांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरल्याच्या निषेधार्थ विविध फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते. राज ठाकरेंना जशास तसे उत्तर देण्यास भीमसैनिक तयार असल्याच्या घोषणा मोर्चेकरी देत होते.
रिपाइंचे राज्य सरचिटणीस नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेससह विविध ५४ संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा विसर्जित झाला. निवासी उपजिल्हाधिकारी यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. प्रा. अनंत लांडगे, पप्पू गायकवाड, नगरसेविका दीप्ती खंडागळे, एस. टी. चांदेगावकर, बी. पी. सूर्यवंशी, बसवंत उबाळे, युवराज धसवाडीकर, रघुनाथ बनसोडे, एन. डी. सोनकांबळे, पंकज काटे आदींसह भीमसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा