विदर्भ दौऱ्याची सांगता अमरावतीच्या जाहीरसभेने करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणात ‘थेट कृती’ करण्याची पद्धत आणि राजकीय महत्वाकांक्षा उघड केली. यावेळी ‘मत’ मांडतानाच त्यांनी मत मागण्याचीही सज्जता ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भात कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि पक्ष संघटनात्मक चाचपणी आटोपून राज ठाकरे यांनी रविवारी अमरावतीत जाहीरसभा घेतली. सभेला प्रचंड गर्दी झाली. दोन आठवडय़ापूर्वी सायन्स कोअर मैदानावरच झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा ही सभा सरस ठरल्याचीही चर्चा सुरू झाली, पण राजकीय वर्तुळात गर्दीपेक्षा राज ठाकरे यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा विषय अधिक चर्चेला आला आहे. ही सभा केवळ ‘मत मांडण्यासाठी’ असल्याची जाहिरात करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात मनसेने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
सभेत राज ठाकरे यांनी खास शैलीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका केली, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी किंवा त्यांनी दिलेल्या ‘टाळी’ला पुन्हा उत्तर देण्याचे टाळले. पश्चिम विदर्भातील शेती, सिंचन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर त्यांनी अधिक भर दिला. सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी वीज प्रकल्पांना दिले जाऊ नये, असे सांगतानाच त्यांनी इंडिया बूल्सच्या वीज प्रकल्पाचा उल्लेख केला. त्याच वेळी मुंबईत इंडिया बूल्सच्या कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली.
राजकारणात ‘थेट कृती’ करण्याची ही पद्धत मुळात शिवसेनेची आहे. त्याचे सुधारित रूप राज ठाकरे यांनी आता आणले आहे. मुळात स्थापनेच्या वेळी कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने मनसेची संघटना बव्हंशी अनौपचारिक होती. राज ठाकरे हे निर्णयांचे केंद्रस्थान असणे स्वाभाविक बनले. कार्यकर्त्यांच्या संपर्कात सुसूत्रता राखण्यासाठी त्यांनी मनसेच्या शाखा ठिकठिकाणी काढल्या, पण विदर्भात शिवसेनेतून त्यांच्या गोटात जाणाऱ्यांची संख्या अत्यंत मर्यादित होती. या सभेच्या वेळीही काही इतर पक्षातील बडे पुढारी मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, पण तसे काही घडलेले नाही. मनसेला विदर्भात अजूनही राजकीय यश न मिळाल्याने हे लोकही सावध भूमिका घेत आहेत, पण सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करून मनसेने पश्चिम विदर्भातील पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून आले. मराठी अस्मिता हा विषय राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मांडला. परप्रांतियांमुळे स्थानिक बेरोजगारांच्या नोकरींची संधी हिरावून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील सिंचनाचा निधी कसा पळवला गेला, या भागातील लोकप्रतिनिधी विधिमंडळात तोंड उघडत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. विदर्भातील उन्हाची सवय आपल्याला आहे. १९९४ मध्ये भरउन्हात आपण नागपुरात मोर्चा काढल्याची आठवणही त्यांनी करून दिली. या भागात मनसेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी अमरावतीच्या सभेचा उपयोग करण्याची राज ठाकरे यांची व्यूहरचना यशस्वी ठरणार काय, हे येत्या काळात दिसणारच आहे, पण शिवसेनेचा खासदार असलेल्या अमरावतीत तुल्यबळ अशी सभा घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेलाही आव्हान दिल्याची प्रतिक्रिया उमटली. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी नेतृत्वाला मानणारा वर्ग हेच राज ठाकरे यांचे खरे ‘लक्ष्य’ असल्याचे दिसून आले आहे.
‘मत’ मांडतानाच राज ठाकरे यांचा मतांचाही जोगवा!
विदर्भ दौऱ्याची सांगता अमरावतीच्या जाहीरसभेने करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणात ‘थेट कृती’ करण्याची पद्धत आणि राजकीय महत्वाकांक्षा उघड केली. यावेळी ‘मत’ मांडतानाच त्यांनी मत मागण्याचीही सज्जता ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 26-03-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray expressing his view to build his vote bank