मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे या उभयतांनी बुधवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. ते महालक्ष्मी मंदिरात आल्याचे समजल्यावर भाविकांसह चाहत्यांनी गराडा घातला. त्यांना अभिवादन करत व मोजकीच चर्चा करून ते मंदिर परिसरातून बाहेर पडले.
कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी राज ठाकरे यांचे काल सायंकाळी आगमन झाले. स्वागत व पत्रकारांशी चर्चा झाल्यानंतर ते खासगी ठिकाणी रवाना झाले होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते महालक्ष्मी मंदिरात आले. त्यांच्या समवेत आमदार बाळा नांदगावकर, शिरीष पारकर, राम कदम, शिशीर शिंदे यांच्यासह जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकर्ते, संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आदी होते.
यापूर्वी घोषित करण्यात आल्यानुसार राज ठाकरे हे सायंकाळी दर्शनासाठी येणार होते. तेथून ते गांधी मैदानातील जाहीर सभेसाठी रवाना होणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला व नियोजित वेळेपेक्षा चार तास अगोदरच त्यांनी दर्शन आवरले.     मंदिरात आल्यानंतर ठाकरे उभयतांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. श्रीपूजकांनी पूजाविधी केला. दर्शन व प्रसाद घेऊन दोघेही कार्यकर्त्यांसमवेत मंदिरातून बाहेर आले. राज ठाकरे महालक्ष्मी मंदिरात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांचे चाहतेही क्षणाधार्थ मंदिरात आले. थोडय़ाच काळात राज ठाकरे गर्दीच्या गराडय़ात गुंतले गेले. जमलेल्या नागरिकांना व चाहत्यांना त्यांनी अभिवादन केले. जाता जाता मोजक्या गप्पाही त्यांनी मारल्या. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Story img Loader