मनसेतील अंतर्गत घडामोडींमुळे आजारपण ओढविलेले आमदार वसंत गिते यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या तीन आमदारांनी प्रयत्न करून सोमवारी त्यांची राज ठाकरेंशी भेट घडवून आणली. तथापि, अवघ्या काही मिनिटांत भेटीचा सोपस्कार पार पाडत खुद्द राज यांनी नाराजी नाटय़ाला फारसे महत्त्व न देण्याची भूमिका स्वीकारल्याचे अधोरेखित झाले. या भेटीद्वारे मनसेने नाराजी नाटय़ावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गिते यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत पायाच्या दुखापतीमुळे रविवारी भेटीला येऊ शकलो नसल्याचे स्पष्टीकरण राज यांना दिले. काही दिवसांतील घडामोडींमुळे मनसेत स्थानिक पातळीवर दोन गट निर्माण झाले असून, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गितेंच्या नाराजीबद्दल कोणतेही भाष्य न करता राज यांनी मुंबईकडे कूच करणे पसंत केल्यामुळे वेगवेगळ्या तर्कवितर्काना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचे सरचिटणीस आ. वसंत गिते यांना डावलून संघटनेची स्थानिक पातळीवर पुनर्बाधणी सुरू झाली. स्थायी समितीच्या निवडणुकीत गिते यांना विश्वासात न घेता थेट निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला गेला. अगदी अलीकडेपर्यंत गिते यांच्या हातात एकवटलेली मनसेची स्थानिक सूत्रे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांत ढिकले कुटुंबीयांच्या हातात गेल्याचे दिसून आले. महापालिकेशी संबंधित निर्णयांमध्ये अविनाश अभ्यंकर यांचा हस्तक्षेप वाढला. पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेऊ लागले. या सर्वाचा परिणाम गिते यांच्या नाराजीत भर पडण्यात झाला. या पाश्र्वभूमीवर रविवारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी विश्रामगृहात गिते यांच्यासह त्यांचे समर्थक पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने गिते हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर असल्याची वदंता सुरू झाली. सोमवारी नाराजी नाटय़ाला वेगळीच कलाटणी मिळाली. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई व दीपक पायगुडे हे सकाळी गिते यांच्या भाभानगर येथील निवासस्थानी जाऊन धडकले. याठिकाणी साधारणत: तासभर
संबंधितांमध्ये चर्चा झाली. चर्चेनंतर गिते यांना घेऊन सर्वजण विश्रामगृहात पोहोचले. या वेळी गिते समर्थक कार्यकर्त्यांची विश्रामगृहात गर्दी झाली होती.
विश्रामगृहातील दालनात राज व गिते यांच्यात अवघी चार ते पाच मिनिटे चर्चा झाली. चर्चा म्हणजे प्रश्नोत्तराचा छोटेखानी वर्ग झाला. त्यानंतर राज हे कोणाशी काहीही न बोलता विश्रामगृहातून बाहेर पडले. त्यांच्या समवेत मनसेचे अन्य आमदार, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, स्थायी सभापती राहुल ढिकले आणि इतर पदाधिकारी होते. हा जथा बाहेर पडल्यानंतर गिते एकटेच बाहेर आले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज यांनी नाराज असल्याबद्दल विचारणा केली, परंतु आपण नाराज नाही. पाय दुखत असल्याने रविवारी त्यांच्या भेटीला येऊ शकलो नाही. भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क झाला नाही. आपल्यासाठी मुंबईतील डॉक्टरांकडून तपासणीची वेळ राज यांनी घेतली आहे. पक्षातील घडामोडींविषयी काही विषय मांडायचे असल्यास ते त्यांच्यासमोर मांडले जातील. यापुढेही आपण मनसेचे काम करत राहू, अशी ग्वाही गिते यांनी दिली. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. राज यांनी क्षणार्धात भेट आवरत या नाराजीला फारसे महत्त्व न दिल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात सुरू आहे.
अनुपस्थित
नगरसेवकांना आवतण
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतास दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना सोमवारी दूरध्वनीद्वारे बोलावणे धाडून हजर करण्यात आले. आजारी असल्याने आ. वसंत गिते यांनी रविवारी राज यांची भेट घेण्याचे टाळले होते. गिते समर्थक प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे तसेच काही नगरसेवकही अनुपस्थित राहिले. सोमवारी हे चित्र बदलण्यासाठी मनसेच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. आदल्या दिवशी अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांना दूरध्वनी करून बोलावून घेण्यात आले. नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण होऊ नये म्हणून हे प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा