मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या २२ फेब्रुवारी रोजी सोलापुरात आणि २३ रोजी तुळजापूर व उस्मानाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. दि. २२ रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांची नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
राज ठाकरे हे दि. २२ रोजी सकाळी सात वाजता मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात दाखल होतील. शासकीय विश्रामगृहात सकाळी दहा ते दुपारी चापर्यंत ठाकरे हे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींनाही ते भेटणार आहेत. नंतर जाहीर सभेत ते जनतेशी संवाद साधणार आहेत. या सभेत सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळ, पाणीप्रश्न, माळढोक अभयारण्याचा प्रश्न, महापालिकेचा कारभार आदी मुद्यांवर ठाकरे हे आपली भूमिका मांडणार आहेत. या वेळी अन्य राजकीय पक्षांतील काही कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Story img Loader