वसंत लोढा, झिंजेंचा मनसेत प्रवेश
मतदारसंघातील, तालुक्यातील प्रश्न आक्रमकपणे सोडवत निवडणुकीची तयारी सुरु करा, असे अवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नगरच्या सरकारी विश्रामगृहावर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. कार्यकर्त्यांना थेट प्रश्न विचारत त्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रश्नांची तसेच पक्ष संघनेतील अडचणींची माहिती घेतली. भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय झिंजे, कामगार नेते सुधीर मुळे आदींनी मनसेमध्ये प्रवेश केला.
ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी शहराच्या दिल्लीगेट भागातील मनसेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून रद्दी जमवून त्यातुन जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप असे उपक्रम आयोजित केले होते. परंतु हे पक्षाचे कार्यक्रमही त्यांनी टाळले. मात्र त्यांच्या प्रतिक्षेत युवा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने त्याठिकाणी उपस्थित होते. हॉटेलवर मुक्काम करुन ते दुपारी औरंगाबाद रस्त्यावरील सरकारी विश्रामगृहावर आले व तेथे बंद खोलीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादातून जिल्हा पदाधिकाऱ्यांना त्यांनी वगळले होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस जयप्रकाश बावीस्कर व अनिल शिदोरे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य शिरोडकर, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता, परिवहन सेनेचे प्रमुख
अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते.
एकावेळी तीन-चार तालुका पादधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी बंद खोलीत संवाद साधला. कार्यकर्त्यांना प्रश्न विचारुन ते मतदारसंघातील, तालुक्यातील समस्यांची माहिती करुन घेत होते. पक्ष संघटनेत येणाऱ्या अडचणी विचारत होते, पक्षाचे पदाधिकारी दौरे करतात का, भेटतात का याची माहिती त्यांनी घेतली. आवश्यक तेथे फेरबदल करु असेही त्यांनी सांगितले. प्रस्थापितांच्या ताब्यात संस्था आहेत त्यामाध्यमातुन अडवणूक होते, यावर त्यांनी तुम्ही संस्था स्थापन करा, लोकांचे प्रश्न सोडवायचे तर स्वत: सक्षम व्हा, मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे सोडवा, प्रश्न सोडवले तरच तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत लोक मदत करतील, असेही त्यांनी सांगितले. महिला आघाडी, कामगार व परिवहन सेना यांच्याशीही त्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. एसटी महामंडळाच्या कराराच्या प्रश्नावर त्यांनी करार कामगार हिताचा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे अश्वासन देताना एसटी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या बंद खोलीत केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. वरिष्ठ पदाधिकारी दरवाजावरच त्याची खातरजमा करीत होते. ठाकरे यांच्याबद्दल युवा वर्गात आकर्षण असल्याचे गर्दी व घोषणां वरुन स्पष्ट झाले. पक्षाचे पदाधिकारी सुनिल बांबुळकर, सतीश धुरी, कैलास गिरवले, किशोर डागवाले, गणेश भोसले, सचिन डफळ, सतीश मैड, केतन नवले, नितीन भुतारे, देवीदास खेडकर, सचिन पोटरे, आनंद शेळके, चंद्रकांत ढवळे आदी उपस्थित होते. प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी ठाकरे दगडफेकीच्या घटनेबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त करतील या प्रतिक्षेत होते, मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
शेकटकर, रासकर, गायकवाड अनुपस्थित
प्रवेशाच्या यादीत नगरसेवक अनिल शेकटकर, माजी नगरसेवक नाना रासकर व सुरेश गायकवाड, उद्योजक प्रमोद मोहळे तसेच भाजपच्या इतरही काही पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचे सांगितले जात होते, मात्र ते अनुपस्थित होते. काँग्रेसचे उबेद शेख यांनीही अचानक विश्रामगृहावर हजेरी लावली, मात्र आपण झिंजे यांना समजवण्यासाठी आलो आहोत, असा खुलासा त्यांनी केला. ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विश्रामगृहाबाहेर कार्यकर्ते प्रचंड गोंधळ घालत होते. अर्थात त्यामागे ठाकरे यांचे आकर्षण होते. संवाद भेटीच्या नियोजनातही गोंधळच होता. गर्दी व रेटारेटीमुळे पोलिसांना अनेकवेळा हस्तक्षेप करत बळाचा वापर करावा लागला. याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, निवडणूक निरीक्षक अतुल सावे, सुनिल रामदासी आदी पदाधिकारीही विश्रामगृहावर होते, आ. शिंदे यांनी आपण ठाकरे यांचे स्वागत करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले, मात्र गोंधळामुळे त्यांची स्वागताची संधी हुकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा