आगामी लोकसभा निवडणुका बघता विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील आढावा घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दुपारी १२ वाजता विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. राज ठाकरे यांनी यावेळी एकाही कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून हारतुरे स्वीकारले नाहीत.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील भरगच्च सभांचा आणि कार्यकर्त्यांंच्या बैठकीचा झंझावात आटोपल्यानंतर विदर्भातील विविध समस्यांचा उहापोह करण्याच्या आणि पक्षसंघटन वाढविण्याच्या दृष्टीने दहा दिवस राज ठाकरे विदर्भ मुक्कामी राहणार असून विविध जिल्ह्य़ात पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार आहेत. ‘मिशन इलेक्शन २०१४’ ही पूर्वतयारी असल्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर राज ठाकरेंसमवेत गाडय़ांचा ताफा थेट रविभवनकडे निघाला. रविभवनला दीड तास आराम केल्यानंतर ते लगेच चंद्रपूरकडे रवाना झाले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, महिला अध्यक्ष रिता गुप्ता, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य शिरोडकर, सुनील हर्षे आणि मनोज हाटे आदी पदाधिकारी मुंबईहून आले आहेत. या दौऱ्यात शनिवारी आणि रविवारी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर,शिरीष पारकर, राम कदम यांच्यासह अनेक आमदार सहभागी होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विमानतळावर पूर्व विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी, प्रवीण बरडे, प्रशांत पवार, किशोर सरायकर, मंगेश डुके, सुनील मानेकर, महेश जोशी, मिलिंद महादेवकर आदी मनसेचे नेते उपस्थित होते.
प्रमुख राजकीय पक्षांमध्ये नेत्यांची संख्या बरीच असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरे ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे किल्ला लढवित आहे. त्यासाठी मनसेचे शिलेदार राज्यातील विविध ठिकाणी वातावरण तयार करण्याचे काम करीत आहेत. राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात दौरे करून जाहीर सभा घेतल्या असल्या तरी विदर्भात मात्र प्रथमच सलग दहा दिवस फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या प्रश्नांकडे राज ठाकरे यांनी विशेष लक्ष घातलेले नसले तरी या दौऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा महत्त्वाचा आहे.  राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. केवळ निवडणुकीच्या काळात दिसणारे मनसेचे कार्यकर्ते नेत्याच्या स्वागतासाठी आज मोठय़ा संख्येने दिसून आले. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी आग्रही असलेल्या राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ विमानतळावर हिंदी भाषिकांचा मोठा वर्गदेखील स्वागतासाठी आला होता. विमानतळावर स्वागत स्वीकारले नसल्यामुळे सर्वजण रविभवनात आले होते. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी चंद्रपुरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मुक्काम ठोकला होता.

राज ठाकरे यांचा विदर्भात सलग दहा दिवस मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे विमानतळापासून रविभवनच्या मार्गावर गुरुवारी रात्री शहरातील विविध भागात मोठमोठे होर्डिग आणि पोस्टर्स लावले. उच्च न्यायालयाने होर्डिग हटविण्याचे आदेश देताच महापालिकेतर्फे गुरुवारपासूनच होर्डिग आणि पोस्टर हटविण्याची कारवाई सुरू असताना ती कारवाई आज पुढे जारी ठेवत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले मोठमोठे होर्डिग आणि पोस्टर त्यांचे आगमन होण्यापूर्वीच काढून जप्त केले. मात्र, रविभवन परिसरात लागलेले होर्डिग राज ठाकरे यांचा ताफा चंद्रपूरला रवाना होईपर्यंत काढण्यात आले नव्हते.

Story img Loader