महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची २६ फेब्रुवारीला परभणीत होणारी जाहीर सभा रद्द झाल्याची माहिती मनसेचे संपर्कप्रमुख दीपक पवार व जिल्हाप्रमुख बालाजी मुंढे यांनी दिली. जालना येथे २ मार्चला आयोजित राज यांची जाहीर सभा विक्रमी करण्याच्या दृष्टीने परभणीची सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज यांच्या परभणीतील जाहीर सभेची गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती. बालाजी मुंढे, विनोद दुधगावकर, गुरुदत्त पहेलानी, विश्वास कऱ्हाळे आदी राज यांची परभणीतील सभा यशस्वी करण्यासाठी गावोगावचे दौरे करून वातावरणनिर्मिती करीत होते. राज यांच्या सभेत इतर पक्षांतील काही प्रमुख लोकांचाही मनसे प्रवेश होणार होता. शहरातील स्टेडियम मैदानावर होणाऱ्या सभेस सव्वा ते दीड लाख लोक येतील, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे स्टेडियम मैदान हे अपुरे पडेल म्हणून राज यांची सभा शहराबाहेरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर घ्यावी, असाही प्रयत्न होता. या दृष्टीने मनसे पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणीही केली होती.
राज यांच्या सभेचे जिल्हाभर पोस्टर्स व बॅनर्स लागले आहेत. मात्र, गेल्या ४ दिवसांपासून राज यांच्या परभणी सभेविषयी साशंकता व्यक्त होत होती. जालना येथे पार पडलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचा विक्रम तोडण्यासाठी मराठवाडय़ात राज यांची एकच सभा व्हावी, असा मतप्रवाह मनसेत होता. काल मुंबईत राज यांच्या उपस्थितीत संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत परभणीची सभा रद्द करून मराठवाडय़ासाठी जालना येथे एकच सभा घेण्याचे निश्चित झाल्याचे कळते. परभणीतील राज यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. मार्चनंतर त्यांची सभा होईल. राज हे २५ फेब्रुवारीला हिंगोलीहून परभणीत मुक्कामी येणार आहेत. दि. २६ फेब्रुवारीला ते सकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत, असे पवार व मुंढे यांनी सांगितले.

Story img Loader