राष्ट्रवादी काँग्रेसचे थेट आव्हान
राज ठाकरे जेव्हा पुण्यात येतील तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीला चोख उत्तर दिले जाईल. राज ठाकरे यांनी पुण्यात येण्याचा दिनांक जाहीर करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले असून राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे, असाही इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे बुधवारी पक्ष कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, हा मोर्चा वाटेत अडविण्यात आल्यानंतर तेथेही मनसेचा जोरदार निषेध करत राज यांना आव्हान देण्यात आले. महापौर वैशाली बनकर, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृहनेता सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, नगरसेवक विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, नंदा लोणकर, तसेच माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, लक्ष्मीकांत खाबिया, म. वि. अकोलकर, रवी चौधरी, वासंती काकडे, नारायण लोणकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हल्ल्यांना जशास तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीमध्ये आहे याचे भान संबंधितांनी ठेवावे, असा इशारा यावेळी काकडे यांनी दिला.
पक्ष कार्यालयात झालेल्या सभेतही राज ठाकरे यांचा निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. राज ठाकरे जेथे सभा घेत आहेत तेथे ते गलिच्छ भाषा वापरत आहेत. त्यात ते राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल जे अनुचित उद्गार काढत आहेत ती भाषा कोणाही सुसंस्कृत माणसाला मान्य होणारे नाहीत. महाराष्ट्रातील शांत वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही. सोलापूर येथे राज ठाकरे यांनी वापरलेल्या भाषेवरून ते खरोखरच प्रबोधनकार ठाकरे यांच्या कुटुंबातील आहेत का, असा प्रश्न पडतो, असे या निषेध ठरावात म्हटले आहे.
पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक तसेच कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध असून राज ठाकरे जेव्हा पुणे शहरात येतील तेव्हा पुण्यात झालेल्या घटनेचा चोख जबाब दिला जाईल, असा इशारा ही सभा देत आहे. त्यांनी पुणे शहरातील त्यांचा येण्याचा दिनांक जाहीर करावा, असे आव्हान आम्ही देत आहोत, असेही या ठरावात म्हटले
आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा