माजी आमदार राजीव राजळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे प्रचाराचेच रणशिंग फुंकले. विचारांच्या आधारावर ही लढाई करणार असून, उपमुख्यंमत्री अजित पवार यांचा हवाला देऊन पक्षाच्या उमेदवारीबाबत आपण निश्चिंत आहोत असे ते म्हणाले.
नगर तालुक्यातील वाळकी येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाबराव कासार होते. पंचायत समितीचे सदस्य गोविंद मोकाटे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, तालुकाध्यक्ष केशव बेरड, युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव, बाबासाहेब गुंजाळ, ज्ञानदेव पांडुळे, दत्ता नारळे, राजेंद्र लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.
अजित पावर यांनी आपल्याला उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत असे सांगून राजळे म्हणाले, लोकसभेच्या मागच्याच निवडणुकीतच त्यांनी आपल्याला आश्वस्त केले होते, मात्र काही अडचणींमुळे त्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळू शकली नाही. त्याच वेळी त्यांनी पुढच्या वेळी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, आता तसे स्पष्ट संकेत देऊन प्रचाराच्या तयारीला लागण्याच्याच सूचना त्यांनी दिल्याची माहिती राजळे यांनी दिली.
सकारात्मक विचारांवर आपले राजकारण सुरू आहे असे सांगून राजळे म्हणाले, नगर लोकसभा मतदारसंघाच्या नेमक्या प्रश्नांवर आपण निवडणूक लढवणार आहोत. मतदारसंघाच्या विकासाचा आराखडाही तयार आहे. उमेदवारीसाठी जिल्हय़ातील नेत्यांना चार ते पाच वेळा आपण भेटलो आहेत, मी विनंती करू शकतो, मात्र झुकणार नाही, तो आपला स्वभावही नाही. नगर तालुक्यातील राजकारण शांततेचे नाही. पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायती व सोसायटय़ांच्या राजकारणात आपण कधीही भाग घेतला नाही, नगर तालुक्यात मात्र तालुक्याचे नेते याही निवडणुकीत भाग घेतात. त्यामुळे तालुक्यातील निवडणुकांना िहसक वळण लागते, त्याचे परिणाम ग्रामसंस्थांना दीर्घकाळ भोगावे लागतात. यातून नव्या पिढीला काय संदेश देणार याचा विचार मतदारांनी केला पाहिजे असे राजळे म्हणाले. नगर तालुक्यातील साकळाई पाणीयोजनेचा प्रभावी पाठपुरावा करून ती मार्गी लावू असले आश्वासनही त्यांनी दिले.