मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूरच्या भरूरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ लेखक राजन खान (पुणे), महाबळेश्वर सल (गोवा) व चित्रकार ल. म. कडू (पुणे) यांच्या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला आहे. पुरस्कार निवड समितीचे संयोजक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत पुरस्कार मानकऱ्यांची घोषणा केली.
राजन खान यांच्या ‘जमीन’ कादंबरीसाठी (मत्रेय प्रकाशन, मुंबई), महाबळेश्वर सल यांच्या ‘तांडव’ कादंबरीसाठी (राजहंस प्रकाशन, पुणे) आणि ल. म. कडू यांच्या ‘खारीच्या वाटा’ ललित लेखनासाठी (राजहंस प्रकाशन) दमाणी साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे. गत वर्षभरात प्रकाशित झालेल्या सुमारे १६० पुस्तकांमधून पुरस्कारप्राप्त पुस्तकांची निवड झाली. पुरस्कार निवड समितीवर डॉ. गीता जोशी, शरदकुमार एकबोटे, प्रा. राजेंद्र दास व प्रा. विलास बेत यांनी काम पाहिले.

Story img Loader