राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यालयातील ई-ऑफिस यंत्रणेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा सन २०१२चे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. पारितोषिक वितरण सोहळा मंत्रालयात संपन्न झाला. यामध्ये इचलकरंजी नगरीचे सुपुत्र, कुटुंब कल्याण आयुक्त व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान संचालक विकास शंकर खारगे (आयएएस) यांना १० लाख रुपये रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाचा एक भाग म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यालयांमध्ये गत वर्षभरापासून ई-फाईल यंत्रणा यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.
ई-फाईल यंत्रणेत नेहमीची पत्रे, आवक-जावक दस्तऐवजांचे व्यवस्थापन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिप्राय निर्णयांसह नस्तीचा सुलभ प्रवास या सर्व गोष्टी एका शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने चालणाऱ्या प्रक्रियेद्वारे ऑनलाइन यंत्रणेकडून चालवल्या जातात. एन.आर.एच.एम.च्या ई-फाईल यंत्रणेचा सकारात्मक परिणाम म्हणून मंत्रालयातील विविध सरकारी विभाग, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई व पुणे येथील सर्व कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी यशस्वीरीत्या ही यंत्रणा एनआरएचएमच्या ई-फाईल यंत्रणेच्या समन्वयाने आणि मार्गदर्शनाखाली राबविली आहे.
आयुक्त खारगे यांनी या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आलेले साहाय्य व मार्गदर्शनाबद्दल मुख्य सचिव बांठिया, अप्पर मुख्य सचिव बेंजामिन यांचे आभार मानले.

Story img Loader