आगामी लोकसभा निवडणुका आणि जिल्ह्य़ातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी रस्सीखेच सुरू असताना कळमेश्वर तालुका भाजपचे अध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव पोतदार यांची नागपूर भाजप जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात
आली.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होताच गेल्या चार- पाच दिवसांपासून नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीला वेग आला होता. अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर आणि अशोक धोटे यांच्या नावाचीही चर्चा होती. रमेश मानकर यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. शिवाय सध्या त्यांच्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी देऊ नये, असा निर्णय पक्षनेत्यांनी घेतल्यामुळे बुधवारी रात्री डॉ. पोतदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
होते.  
आज सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते बळवंतराव ढोबळे, आनंदराव ठावरे, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रेशखर बावनकुळे, विजय घोडमारे, आमदार सुधीर पारवे, श्रीकांत देशपांडे, सहसंघटनमंत्री डॉ. कोठेकर, संजय फांजे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, तालुका अध्यक्ष आणि नगर अध्यक्ष उपस्थित होते. दुपारी १२ वाजता बैठकीला प्रारंभ झाल्यानंतर आमदार बावनकुळे यांनी डॉ. राजीव पोतदार यांचे नाव
सुचविले.
अशोक धोटे, रमेश मानकर, अशोक मानकर, आनंदराव राऊत यांनी अनुमोदन दिल्यावर दुसरे कुठलेही नाव न आल्यामुळे निवडणूक निरीक्षक गिरीश व्यास यांनी डॉ. पोतदार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर
केले.
डॉ. पोतदार यांच्या नावाची घोषणा करताच कळमेश्वर, सावनेरसह जिल्ह्य़ातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या निनादात फटाक्याची आतषबाजी करीत त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
डॉ. पोतदार भाारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. कळमेश्वर भाजपाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, कळमेश्वर नगर परिषदेचे सदस्य, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि नागपूर जिल्हा प्रभारी म्हणून त्यांनी काम बघितले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
डॉ. पोतदार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी आणि रेशीमबागमधील स्मृती परिसरात भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. सायंकाळी वाडय़ावर जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद
घेतले.
आगामी  निवडणुका मोठे आव्हान- डॉ. पोतदार
जिल्हाध्यक्ष निवड करून पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून जिल्ह्य़ात संघटनात्मक दृष्टय़ा काम वाढविण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. राजीव पोतदार यांनी व्यक्त केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोठय़ा अपेक्षेने जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका असल्यामुळे रामटेक आणि नागपूर या दोन्ही मतदार संघात युतीचे उमेदवार निवडून आणणे हे येणाऱ्या काळातील मोठे आव्हान असल्यामुळे त्यासाठी जिल्हयात कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्यासोबतच लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करणार आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून काम करणार असल्याचे डॉ. पोतदार यांनी सांगितले.   

Story img Loader