प्रपंच हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असल्यामुळे मनुष्य व जनावर यांच्यामध्ये कोणताच फरक नाही. धर्माच्या आचरणाने मनुष्यत्व प्राप्त होत असताना जीवनात स्थिरता निर्माण होते. वर्तमानातील परिस्थती पाहता परमार्थ आधारित प्रपंच आणि धर्मावर आधारित राजव्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
सद्गुरू माधवनाथ महाराज विश्वस्त मंडळातर्फे इतवारीमधील खटीवाडामध्ये श्रीनाथ मंदिर परिसरातील माधवनाथ महाराजांच्या गादी व समाधीच्या जागेचे नूतनीकरण करून त्याची पुनप्र्रतिष्ठापना करण्यात आली. या नव्याने तयार करण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण समारंभ आज अंजनगाव सुर्जीचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, महापौर अनिल सोले, बांधकाम व्यवसायी व्यकंटेश कुणावार, श्रीरामपंत जोशी, बुधोलिया महाराज, गंगाधरपंत अनंतवार, दामोधर देव उपस्थित होते.
परमार्थ आणि प्रपंच वेगळे नाही. याची जाणीव आपल्याकडे फार पूर्वीपासूनच झाली आहे. सत्य हेच परमार्थ आहे. आपल्याकडे शिशु अवस्थेत असल्यापासून परमार्थ सांगितला जातो. संघाचे कार्य सुद्धा असेच आहे. संकटकाळ येण्यापूर्वीच त्यातून बचाव होण्यासाठी आपल्या संतानी मोठे कार्य केल्याचा इतिहास आहे. तेथूनच संतपरंपरा उदयास आली आहे. देव, देश, धर्म वेगळे नाहीत हे आपण दाखवून दिले आहेत. आज विज्ञानाच्या अहंकारामुळे इतर देश परमार्थ विसरत असल्यामुळे ते आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे संतांनी केलेले कार्य मोठे आहे. समाजात परमार्थ आधारित प्रपंच आणि धर्म आधारित राज्य व्यवस्था निर्माण करण्याचे काम अशा मंदिरातून केले जात आहे असेही डॉ. भागवत म्हणाले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, माधवनाथ महाराजांचे मंदिर हे सर्व नाथ भक्तासाठी आस्थेचे प्रतीक आहे. इंदौरमध्ये माधवनाथ महाराजांचे मोठे आणि प्रशस्त मंदिर असून नागपुरात तशाच पद्धतीचे मंदिर तयार होऊन आणि ते सर्वासाठी श्रद्धेचे स्थान राहील असेही गडकरी म्हणाले. यावेळी जितेंद्रनाथ महाराज आणि व्यकंटेश कुणावर यांची भाषणे झाली. यावेळी उद्योगपती कुणावर यांनी भक्ताच्या निवासासाठी दहा हजार चौरस फूट जागेचे दान केले. शिवाय ही जागा शोधून मंदिराच्या व्यवस्थापनानी त्या जागेचा ताबा घ्यावा अशी सूचना
केली.  यावेळी मंदिराच्या संकेतस्थळाचे आणि श्रीनाथ गीतांजलीचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासंती निचकवडे यांनी तर संचालन अभिजित मुळे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajmanagement is needed in religion and and day life rss cheif