राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करत असतांनाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनीही ब्रम्हपुरी येथील शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. शेतकऱ्यांप्रती खऱ्या अर्थाने चिंता असणारा त्यांच्यासारखा नेता आपण बघितला नाही. अशा संवेदनशील नेत्याने राष्ट्रीय अध्यक्ष राहावे, अशी सर्वाची मनोमन इच्छा होती आणि आहे. आपण दिल्लीत हजर असतो तर त्यांना राजीनामा कधीच देऊ दिला नसता, असेही ते म्हणाले.
गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नागपुरात आगमन होताच हजारो भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. राष्ट्रीय अध्यक्षपद गेल्यानंतरही गडकरी यांनी नागपूर, तसेच विदर्भात कार्यक्रमांचा धडाका लावला असून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा करत आहेत. विरोधकांकडून गडकरी यांची स्तुती होत असतांनाच आता स्वपक्षीय नेत्यांकडूनही गडकरी यांचा गौरवपूर्ण उल्लेख होत आहे. आज ब्रम्हपुरीच्या मेळाव्यात तर राजनाथसिंग यांनी विदर्भातच काय संपूर्ण महाराष्ट्रात गडकरी यांच्यासारखा संवेदनशील नेता नसल्याचे सांगितले. विदर्भाच्या मातीत जन्माला आलेल्या गडकरी यांना विदर्भातील शेतकऱ्यांप्रती खऱ्या अर्थाने कळकळ आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात ते आघाडीवर आहेत. विदर्भातील धान, कापूस व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. अशा जाणत्या राजावर विरोधकांनी अशा पध्दतीने आरोप करणे गलिच्छ राजकारणाचे प्रतीक आहे. विदर्भाशी इमान राखणारा हा नेता सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा, अशी भाजपतील प्रत्येक नेत्याची इच्छा होती. किंबहुना, आपण स्वत: दिल्लीत हजर असतो तर गडकरी यांना कदापि राजीनामा देऊ दिला नसता, असेही राजनाथसिंह म्हणाले.
मात्र, अशाही परिस्थितीत न डगमगता गडकरी यांनी राजीनामा देऊन कोणत्याही चौकशीला सामोर जाण्याची तयारी दाखवली आहे. आज सत्ताधारी पक्षांवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होत आहेत, मात्र अशाही परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना खूर्चीचा मोह सुटलेला नाही. येत्या काळात गडकरी उंच भरारी घेतील, असा विश्वासही राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. गडकरी आज विदर्भाचे नव्हे तर देशाचे नेते झाले आहेत, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh says goodwords about gadkari