कोल्हापूर महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे राजू लाटकर यांची वर्णी लागली. परिवहन सभापतीपदी राजू पसारे तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सरस्वती पोवार यांची निवड झाली. मंगळवारी महापालिकेचे नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.
महापालिकेच्या स्थायी समिती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत जोरदार चुरस होती. समितीतील पक्षाच्या चारही नगरसेवकांनी सभापतिपद खेचून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर लाटकर यांनी बाजी मारली. मावळते सभापती शारंगधर देशमुख हे लाटकर यांचे सूचक होते. तर अजित पोवार हे अनुमोदक होते. लाटकर यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी आंनदोत्सव साजरा केला.
परिवहन समितीच्या सभापतिपदासाठी पसारे यांचे नाव राजाराम गायकवाड यांनी सुचविले, तर संगीता देवकर या अनुमोदक होत्या. बहुतेक नगरसेवकांचा आग्रह स्थायी समितीमध्ये जाण्याचा होता. त्यामध्ये संधी न मिळाल्याने काहींनी परिवहनचा आधार घेतला. परिणामी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्यासाठी एकही नगरसेविका राजी नव्हती. अखेर सरस्वती पोवार यांच्या गळ्यात माळ घालण्यात आली. त्यांच्यासाठी लिला धुमाळ या सूचक होत्या, तर बिना सूर्यवंशी या अनुमोदक होत्या.

Story img Loader