उत्तरांचल राज्यातील महापुराच्या आपत्तीमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्हय़ातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मूमध्ये असलेल्या खासदार शेट्टी यांनी कमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील सुमारे ६० लोक बद्रिनाथ येथील धर्मशाळेमध्ये सुरक्षित असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.    
कोल्हापूर जिल्हय़ातील भाविक मोठय़ा संख्येने बद्रिनाथ, केदारनाथ यासह अन्य धार्मिक ठिकाणी देवदर्शन तसेच पर्यटनासाठी गेले आहेत. उत्तरांचल राज्याला महापुराचा तडाखा बसल्याने हे भाविक अडचणीत सापडले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर खासदार शेट्टी यांनी जम्मूमधून मदतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कमोलीचे जिल्हाधिकारी मुर्गेशन तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी त्यांनी संपर्क साधला. कोल्हापूर, सांगली, सीमाभाग येथील सुमारे ३०० लोक सध्या बिष्णोई गुरू जमलेश्वर सेवा ट्रस्टमध्ये सुरक्षित आहेत. तसेच जवळच असलेल्या दिगंबर जैन मंदिरातही काही भाविक असून तेही सुरक्षित आहेत. या सर्वाना निवास, भोजन, वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. रामदेव बाबा ट्रस्ट, माजी मंत्री किशोर उपाध्याय यांच्यामार्फत भाविकांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे.    
भाविकांच्या मन:स्थितीविषयी खासदार शेट्टी म्हणाले, सध्या बिष्णोई मठामध्ये सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. मात्र त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. रस्तामार्ग बंद झाला असल्याने त्यांना आणखी काही दिवस तेथेच राहावे लागणार आहे. दळणवळणाची व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर त्यांना इच्छित स्थळी नेले जाणार आहे. या भागात जाण्याची माझीही तीव्र इच्छा आहे. मात्र महापुराने हाहाकार घातल्याने आणि अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याने प्रवासात अडचणी येत आहेत. लष्कर व प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच तेथे पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांना सर्वप्रकारची मदत व्हावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा