स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी आज ताकदीने रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्र्यांच्या कराडात ऐतिहासिक भव्य ऊसउत्पादकांच्या मोर्चाने ऊसदराच्या मागणीची दाहकता मांडली आहे. दरम्यान,‘स्वाभिमानी’ चे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, सातारा जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सहका-यांसमवेत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शेतक-यांना न्याय देण्यासाठी आपला वारसा सांगणारे राज्यकर्ते व साखर सम्राटांना सुबुद्धी द्या, असे साकडे घातले आहे. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जलदकृती दलाच्या जवानांसह शेकडो पोलिसांचा चोख बंदोबस्त शहरासह तालुक्यात तैनात होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला तर पोलिसांनी गराडाच घातला होता.
यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी आवर्जुन संवाद साधला. आम्ही महाराष्ट्राचे बाप म्हणजे शेतकरी, उसाला योग्य दर मिळावा या न्याय्य मागण्यासाठी येथे जमलो असताना, राज्याच्या नेतृत्वासह बडे नेते तिकडे मुंबईत क्रिकेट मॅच बघण्यात मग्न असल्याची जळजळीत टीका करून शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी व सर्वसामान्य जनता अनंत अडचणींना तोंड देत असताना, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे ‘तथाकथित चेले’ दिल्ली व मुंबईत सत्तेची फळे चाखताना, सर्वसामान्य जनता व शेतक-याला वा-यावर सोडत आहे. कोटय़वधींचे संसार ऊस पिकावर अवलंबून असताना, उसाला योग्य दर देण्यावेळी साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे केले जात आहे. आम्ही एक महिन्यापासून ऊसदरासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र, राज्य शासन मध्यस्थी न करण्याची भूमिका घेत आहे. हरयाणा सरकारने ३ हजाराची पहिली उचल जाहीर केली आहे. कर्नाटक व अन्य राज्यांनीही ऊसदर जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्राचे राज्यकर्ते व साखर कारखानदार काहीच बोलायला तयार नाहीत. तरी, येत्या २५ नोव्हेंबरला यशवंतरावांच्या पुण्यतिथीदिनी येथे येणा-या मंत्र्यांना व मान्यवरांना शेतक-यांची कैफियत जाणून घेण्याची तसेच, शेतक-यांना न्याय देण्याची सुबुद्धी मिळावी असे साकडे आपण आज यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्थळी घातले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
 

Story img Loader