शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने रक्षाबंधन सण विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. रिक्षाचालक, लष्करी जवान तसेच निरीक्षणगृहातील झाडांना राखी बांधण्यात आली. काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निरीक्षणगृहातील विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली. काही शाळांनी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
समर्थ महिला मंडळ
समर्थ महिला मंडळाच्यावतीने शहर परिसरातील रिक्षाचालकांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. शिवाजी चौक, राणेनगर, पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, सातपूर, अशोकनगर, शिवाजीनगर, गंगापूर, आनंदवली येथील रिक्षा थांब्यावर जाऊन महिलांनी चालकांना राखी बांधली. त्यासोबत एक कृतज्ञता पत्रक देऊन त्यांचे आभार मानले. नगरसेविका सीमा हिरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नालंदा अकादमीतर्फे पर्यावरणस्नेही उपक्रम
नालंदा अकादमीच्यावतीने झाडांना राखी बांधून वेगळ्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. झाडे आपले मित्र असतात, ते वातावरण शुद्ध ठेवतात आणि निसर्गचक्र सुरळीत राहण्यासाठी त्यांची मदत होते, हा संदेश मुलांना देण्यासाठी या अभिनव रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राखी रंगविणे, राखी बनविणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. मुलांनी तयार केलेल्या तसेच रंगविलेल्या राख्या शाळेच्या कला शाखेच्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.
जिजाऊ ब्रिगेडतर्फे जवानांसमवेत रक्षाबंधन
जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी आर्टिलरी सेंटर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या लष्करी जवानांना राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी बहिणींच्या आठवणींनी जवानांचे डोळे पाणवले. कार्यक्रमास मेजर सुभेदार कुलदीप सिंग, सुभेदार अनिल शिंदे, सुभेदार रामानुज, ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे, महानगरप्रमुख ज्योती काथवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे रक्षण करताना सैनिकांना कुटुंबांपासून तसेच वेळोवेळी होणाऱ्या सणोत्सवापासून दूर राहावे लागते. सैनिकांचा हा त्याग मोठा असून त्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत, असे भदाणे यांनी सांगितले. कर्नल कुलदीप सिंग यांनी रक्षाबंधन सण जवानांना घरापासून कोसो दूर असल्याने साजरा करता येत नाही, मात्र जिजाऊ ब्रिगेडच्या उपक्रमामुळे या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीची उणीव भरून निघाल्याचे नमूद केले. महिलांनी सैन्य दलात प्रशिक्षण घेणाऱ्या सूरज सिंग, पवन बाटी, नरेंद्रसिंग, अंकित कुमार, गिरीश लांडगे, राहुलकुमार यादव यांच्यासह अन्य प्रांतातील जवानांना राख्या बांधून गुलाबपुष्प देत राखी पौर्णिमा साजरी केली. यावेळी ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, हमारे देश को सही सलामत रखना’ आदी गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी सुभेदार कर्नल कुलदीप सिंग यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. सीमेवरील जवानांसाठी संकलित केलेल्या राख्याही अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
न्यू इरा शाळा
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी न्यू इरा शाळेत झाडाला राखी बांधण्यात आली. शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जागरूक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच भाग म्हणजे झाडांचे संरक्षण करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त सरंगल यांच्या पत्नी इंदू सरंगल उपस्थित होत्या. शाळेच्या आवारातील झाडाला विद्यार्थ्यांनी तयार केलेली राखी बांधण्यात आली. झाडांचे संरक्षण करण्याची शपथही घेण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
युवक काँग्रेस व राजमुद्रा प्रतिष्ठान
नाशिक शहर युवक काँग्रेस आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त निरीक्षणगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निरीक्षणगृहातील विद्यार्थिनींच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी विविध प्रकारच्या भेटवस्तू तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, पवन आहेर, अजिंक्य सोनवणे, सलमान शेख, अमोल भंदुरे आदी उपस्थित होते. तसेच यापुढे सर्व सण-उत्सव या विद्यार्थ्यांबरोबर व आदिवासी पाडय़ातील परिवारांसोबत साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.