सप्टेंबरपासून करण्यात आलेल्या वीज दरवाढीमुळे शहरातील यंत्रमाग व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता असल्याचा दावा करीत दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी मालेगाव पॉवर कन्झ्युमर्स असोसिएशनतर्फे येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरावर कोसळलेल्या या संकटाची दखल घेऊन शासनाने त्यात हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
यंत्रमाग व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो. कृषी क्षेत्रानंतर रोजगार उपलब्ध करून देणारा हा सर्वाधिक मोठा व्यवसाय मानला जातो. असे असले तरी या व्यवसायाला सरकारकडून पुरेसे संरक्षण दिले जात नाही. उलटपक्षी अडचणीत आणणारे धोरणे आखले जात असल्याचा सूर आंदोलकांनी लावला. वीज दरवाढ हा त्याचाच एक भाग असून देशातील यंत्रमाग व्यवसायाच्या तुलनेत जवळपास निम्मे यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील या यंत्रमागधारकांच्या माथी इतर राज्यांच्या तुलनेत महागडी वीज लादली जात असल्याकडेही आंदोलकांनी लक्ष वेधले.
वीज दरवाढीमुळे आधीच अडचणीत सापडलेला हा व्यवसाय अधिकच संकटात ढकलला जात असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे मागील आठवडय़ात येथे वाढीव देयकांची होळी करण्यात आली होती. आता विविध उद्योजक संघटना आणि पक्षांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात आ. मौलाना मुफ्ती इस्माईल, जनता दलाचे बुलंद एकबाल, काँग्रेसचे साबिर गोहर, राष्ट्रवादीचे इब्राहिम हाजी, तिसरा महाजचे नगरसेवक एजाज बेग, एजाज उमर यांसह भरत आमिन, निंबा महाजन आदी यंत्रमाग कारखानदार व उद्योजक सामील झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा