देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत. सोयाबीन, ऊस, कापूस पिकांच्या भावाबद्दल सातत्याने ओरड करणारे राजकारणी कांद्याच्या कोसळत्या दराबद्दल मात्र एक शब्दही बोलायला तयार नाहीत. कांद्याचे निर्यातमूल्य शून्य टक्क्यावर न आणल्यास कांदा उत्पादकांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. मात्र, निर्यातमूल्य वाढवून देशातील कांदा उत्पादकांची माती करण्याचा घाट सरकारने घातला असल्याची जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
कांद्याच्या भावातील घसरणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेधव अन्य मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी खोत बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना लोकप्रतिनिधी कारखाने, बँका आदी सहकारी संस्थांची लुटमार करून सहकार चळवळ मोडीत काढत लागल्याचा आरोप खोत यांनी केला. प्रस्थापितांना सत्तेची मस्ती चढली असून, येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी एकजुटीने या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याची गरज निर्माण झाली आह, असेही ते म्हणाले.
२५ डिसेंबरला सरकारची प्रेतयात्रा
शेतकऱ्यांवर दिवाळखोरीची वेळ आणणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी गावागावांतून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येणार आहे. प्रेतयात्रा काढून पुतळे जाळण्यात येणार असून, या आंदोलनात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही खोत यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, शेकापचे धनंजय पाटील, संजय पाटील धाटणीकर, शेतकरी अभय भोसरेकर यांचीही भाषणे झाली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, मुजीब पठाण आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून निवेदन स्वीकारण्यास कोणीच येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयासमोरील महामार्गावर ठिय्या दिला. तहसीलदार सुभाष काकडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा