इतर कारखान्यांप्रमाणे उसाला प्रतिटन २२५० रुपये भाव द्यावा, परस्पर कपात केलेले शेतक ऱ्यांचे पैसे तत्काळ परत द्यावेत, यासह विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने माजलगाव सहकारी साखर कारखान्यावर सोमवारी मोर्चा नेण्यात आला. मागण्यांवर १५ दिवसात निर्णय न झाल्यास कारखान्याचे प्रमुख महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध थेट संघर्ष करू. प्रसंगी त्यांच्या गाडय़ा आडवू, असा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला. राष्ट्रवादीच्या वैद्यनाथ कारखान्यावरील मोर्चाला भाजपने सोळंकेंच्या कारखान्यावर मोर्चा काढून प्रत्त्युराचा दणका दिला.
बीड जिल्ह्य़ात भाजप, राष्ट्रवादीमध्ये ऊसदरावरून उभा संघर्ष पेटला आहे. मागील महिन्यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादीसमर्थक भाजप बंडखोर आमदार धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे फुलचंद कराड यांनी मोर्चा काढून ‘वैद्यनाथ’ने इतरांप्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी केली. ‘वैद्यनाथ’वर स्थापनेपासून प्रथमच मोर्चा निघाल्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादीच्या ताब्यातील सर्व कारखान्यांवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव कारखान्यावर सोमवारी भाजपचे माजी आमदार केशवराव आंधळे, गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक ऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. इतर कारखान्यांप्रमाणे माजलगाव कारखान्यानेही २२५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अडीचशे रुपये फरक बिल राहिले.

Story img Loader