कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनांतर्गत पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी पाच कारखान्यांवर धडक मारली. व्यवस्थापनाला महिन्याअखेरपर्यंत हप्ता अदा करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. याची कारवाई न झाल्यास कारखान्यातून साखर बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिला.    
गतवर्षीचा साखर हंगाम संपून चार ते पाच महिने झाले. बहुतेक कारखान्यांनी हंगामातील पहिली उचल २५०० रुपये दिली होती. त्यानंतर कारखान्यांकडून दुसरा हप्ता मिळालेला नाही. फक्त शाहू साखर कारखान्याने १०० रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. कागलच्या शाहू प्रमाणे अन्य कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी कारखान्यांवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.    
शनिवारी पहिल्या दिवशी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पाच साखर कारखान्यांवर रॅली पोहचली. सर्वप्रथम शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखाना येथे रॅली पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी १०० रुपये हप्ता मिळाला पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सावकार मादनाईक, उल्हास पाटील, आदिनाथ हेमगीरे, आण्णासाहेब चौगुले, के.आर.चव्हाण, सागर शंभूशेटे यांच्यासह ७०० हून अधिक शेतकरी आंदोलनात उतरले होते. दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष युसूफ मेस्त्री व व्यवस्थापक बी.जे.पाटील यांनी स्वाभिमानीचे निवेदन स्वीकारले. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मागण्यांबाबत विचार करण्यात येईल. कारखान्याची स्थिती तपासून दर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर गुरूदत्त या टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील खासगी साखर कारखान्याच्या संचालकांना याच मागणीचे निवेदन देण्यात आले.    
शिरोळ तालुक्यानंतर हातकणंगले तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले. प्रथम त्यांनी हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर रॅली काढली. तेथे संचालकांना १०० रुपये हप्ता मिळण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. सायंकाळी गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखाना व त्यानंतर नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकांना निवेदन देण्यात आले. नरंदेजवळ असलेल्या खोची या गावामध्ये रात्री खासदार राजू शेट्टी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.    
शनिवारी पाच कारखान्यांना निवेदने देण्यात आली असली तरी ही मोहीम टप्प्याटप्प्याने अन्य कारखान्यांपर्यंत नेण्यात येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी वारणा, दालमिया शुगर, कुंभी-कासारी, राजारामया कारखान्यांवर रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागाकडील साखर कारखान्यांवर पुढच्या टप्प्यात रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष काटे यांनी दिली.

Story img Loader