तीन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी आयटकप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता. दरम्यान, या संपाचा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेवर परिणाम झाला. महापालिकेकडून वेतनाबाबत निर्णय न झाल्याने उद्या (बुधवारी) जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिली.
शहर महापालिकेचे वेतनासाठी मिळणारे सहायक अनुदान सप्टेंबरमध्ये बंद झाले. त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना महापालिकेकडून वेतन देण्याबाबत कुठल्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे मनपा कामगार कर्मचारी युनियनने संप पुकारला. संपात सफाई, उद्यान, पाणीपुरवठा व वीज विभागांतील जवळपास ५०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास मनपा कर्मचारी संघटनाही संपात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वेतन मिळेपर्यंत संप चालूच राहील, असा निर्धार क्षीरसागर यांनी बोलून दाखविला. महापालिकेकडून संघटनेशी अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. उद्या दुपारी १२ वाजता शनिवारबाजार येथून संपावरील कर्मचाऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास शहरातील पाणीपुरवठा, तसेच स्वच्छतेचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे.
कायम कामगारांचा साडेतीन महिन्यांचा पगार थकीत असून रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा पगार थकीत आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीही मोठी रक्कम कर्मचाऱ्यांना मनपाकडून येणे आहे. कामगारांचा किमान वेतनाचा फरक ५० लाख थकीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा