अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांना दरमहा साडेचार हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र, कमी पगारी फुल अधिकारी अशी त्यांची अवस्था आहे. या सेविकांना किमान १० हजार रुपये वेतन मिळावे, सन २००४ पासून त्यांना पेन्शन योजना जाहीर करावी, मानधनाची रक्कम दरमहा १० तारखेच्या आत मिळावी. उन्हाळी सुटी मिळावी. सर्व सोयींनी युक्त अंगणवाडी केंद्र बांधले जावे आदी मागण्या आहेत. गेल्या १६ दिवसांपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत. मात्र, त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हय़ात २ हजार २४१ अंगणवाडय़ा व त्यात ५८ हजार ७०० बालके जातात. ग्रामीण भागात ३३ हजार व शहरी भागात २ हजार गरोदर मातांची काळजी या अंगणवाडी सेविकांना घ्यावी लागते. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर आहे. ३६५ दिवस अंगणवाडी सेविकांकडून काम घेतले जाते. त्यामुळे त्यांना नियमानुसार सुटय़ा, रजा दिल्या जाव्यात, अशीही मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा